Join us

'गच्ची' साठी प्रियाची 'लपाछपी'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 4:16 PM

मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापटचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अनेक हीट सिनेमामधून आणि आपल्या अभिनय कौशल्यातून रसिकप्रेक्षकांच्या हृदयात ...

मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बापटचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अनेक हीट सिनेमामधून आणि आपल्या अभिनय कौशल्यातून रसिकप्रेक्षकांच्या हृदयात स्थान कमावलेल्या प्रियाला आपल्या चाहत्यांच्या गराड्यात राहायला खूप आवडते. मात्र, कामाच्यावेळी या सर्व गोष्टींपासून दूर राहत, नियोजित वेळेत काम पूर्ण करण्याचा तिचा अट्टाहास असतो, मग त्यासाठी तिला तिच्या चाह्त्यांसोबत 'लपाछपी' चा डाव देखील खेळावा लागतो. असेच काहीसे झालेय 'गच्ची' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान लँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्राॅडक्शन्स निर्मित 'गच्ची' या सिनेमाच्या शुटींगदरम्यान प्रियाने अगदी चित्रीकरण संपेपर्यंत तिच्या चाहत्यांपैकी कोणालाच तिचा सुगावा लागून दिला नव्हता.नचिकेत सामंत दिग्दर्शित 'गच्ची' या सिनेमाचे मुंबईच्या लालबाग येथील 'विघ्नहर्ता' या टोलेजंग इमारतीच्या गच्चीवर चित्रीकरण करण्यात येत होते. मराठीबहू लोकवस्ती असलेल्या या भागात प्रिया बापट हे नाव खूप मोठे असल्याकारणामुळे, २३ मजल्याच्या इमारतीतून गच्ची गाठण्याचे मोठे आव्हान तिच्याकडे होते. अश्यावेळी तोंडाला स्कार्फ गुंडाळत तडक लिफ्टच्या दिशेने धावत जात, स्वत:ची ओळख लपवण्याचा तिने कसोशीने प्रयत्न केला होता. मात्र, शेवटच्या दिवशी प्रियाचे गुपित समोर येईल असा एक प्रसंग तिथे घडला. सिनेमाच्या शेवटच्या सीनचे चित्रीकरण त्यादिवशी होणार होते, गच्चीवर शूट असल्याकारणामुळे अंधार व्हायच्याआधी चित्रीकरण संपवणे गरजेच होत. मात्र, एनवेळी लिफ्ट बंद पडल्यामुळे, 'प्रिया'ला सेटपर्यंत कसे घेऊन जायचे हा प्रश्न टीमला पडला, तसेच सूर्यास्ताला काहीच तास राहिले असल्यामुळे, चित्रीकरण वेळेत पूर्ण होणे अशक्य झाले होते. अशावेळी प्रियाने स्वतःचा चेहरा झाकत २३ मजले पायी चढत गच्ची गाठली. आश्चर्याची बाब म्हणजे, आपल्यासमोरून आपली लाडकी अभिनेत्री जात आहे, याचा अंदाजदेखील कोणालाच आला नव्हता. प्रियाने हा 'लपाछपी' चा डाव अगदी शेवटपर्यंत चालू ठेवला होता, आणि त्यात ती यशस्वीदेखील झाली. कारण, चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत आपल्या गच्चीवर प्रिया बापटच्या सिनेमाचे शुटींग होते, हे बिल्डींगमधील कोणालाच कळले नव्हते. 'गच्ची' सिनेमाच्या या मजेशीर आठवणीला उजाळा देताना प्रिया सांगते कि, 'मला प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकायला, त्यांच्यासोबत काही क्षण घालवायला आवडते. त्यांना नकार देणे मला आवडत नाही. मात्र, शुटींगदरम्यान कामाला पहिले प्राधान्य देताना, ते कधी कधी दुखावले जातात. त्यामुळे ते टाळण्यासाठी, तसेच शुट स्मूथली चालू राहण्यासाठी, मी स्वतःची ओळख लपवण्याचा करते. शिवाय काही चित्रपटातील लूक हे गुपित ठेवायचे असतात, त्यामुळे इतक्या लवकर लोकासमोर त्याचा उलगडा होऊ नये, यासाठी शक्यतो प्रत्येक कलाकार तसा प्रयत्न करत असतो. 'गच्ची' सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान असेच काहीसे माझ्यासोबत घडले.' 'या सिनेमात प्रिया सोबत अभय महाजन हा अभिनेता झळकणार असून, येत्या २२ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.