लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई - 'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक दोन संचात रंगभूमीवर येणार असल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. या विरोधात मूळ नाटकाचे निर्माते उदय धुरत यांनी शरद पोंक्षेना ७२ तासांची नोटीस पाठवली आहे.
'मी नथुराम गोडसे बोलतोय' या नावाने एकाच वेळी दोन नाटके रंगभूमीवर येणार आहेत. मूळ नाटकाचे निर्माते माऊली प्रोडक्शनचे उदय धुरत नव्या संचात हे नाटक आणत आहेत, तर यात मुख्य भूमिका साकारणाऱ्या शरद पोंक्षे यांनी पुन्हा नथुरामचा वेष धारण करत 'नथुराम गोडसे बोलतोय' या नाटकाचे ५० प्रयोग करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी मूळ नाटकाचे दिग्दर्शक विनय आपटे यांचे बंधू लेखक-दिग्दर्शक विवेक आपटे यांनी धुरत यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन आपले म्हणणे मांडले. या संदर्भात पोंक्षे यांना दोन नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. 'मी नथुराम गोडसे बोलतोय' आणि 'नथुराम गोडसे बोलतोय' ही दोन्ही शीर्षक धुरत यांच्याकडे नोंदणी केलेले आहे. स्क्रिप्ट आम्हाला दाखवावी किंवा नाटकाचे नाव बदलावे असे वकील ए. एल. गोरे म्हणाले.
यावेळी सौरभ म्हणाला की, माझ्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उभ्या राहिलेल्या या नाटकात टायटल रोल करण्याचे भाग्य लाभले. मी कोणाला कॉपी करणार नाही. तुलना होईल पण मी त्याचा विचार करत नसल्याचे सौरभ म्हणाला. उदय धुरत म्हणाले की, हा प्रकार मराठी रंगभूमीसाठी घातक आहे. आम्ही पोंक्षे यांना ७२ तासांची अंतिम नोटीस पाठवली आहे.
नोव्हेंबरमध्ये नव्या कलाकारांच्या संचात 'मी नथुराम गोडसे बोलतोय हे मूळ नाटक रंगभूमीवर येणार आहे. २०१७-१८मध्ये हे नाटक बंद झाले तेव्हा पोंक्षे यांनी मला नाटकाचे पुनर्लेखन करण्याची ऑफर दिली, पण मी नकार दिला होता. अशा त्यांनी मला तीन वेळा विविध प्रकारे ऑफर्स दिल्या, पण प्रदीप दळवी यांनी लिहिलेल्या नाटकात बदल करायचा नव्हता. आता हे नाटक २५ वर्षांच्या काळानुरूप बदल करण्यात येणार असून शुभारंभाचा ८१७वा प्रयोग होणार असल्याचे लेखक-दिग्दर्शक विवेक आपटे म्हणाले.