पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर सर्वत्र खळबळ माजली असून राज्यात पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सर्वच स्तरातून या घटनेवर संताप व्यक्त केला जात आहे. आता मराठी अभिनेता पुष्कर जोगदेखील भडकला आहे.
पुष्करने या घटनेबाबत संतप्त पोस्ट शेअर केली आहे. "पुण्यात एका २६ वर्षीय मुलीवर स्वारगेट बस स्थानकाच्या बसमध्ये अत्याचार झाले.. क्लेशदायक, संतापजनक बातमी..आता बास!!! नराधमाला सोडू नका...सापडला तर धरून फोडा त्याला..#राग", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्याबरोबरच "आता रडायचं नाही नडायचं...बलात्काऱ्यांना रस्त्यावरच मारायचं", अशा आशयाची पोस्टही त्याने शेअर केली आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्यात नोकरी करणारी तरुणी पहाटे साडेपाचच्या सुमारास फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकात आली होती. बसची वाट पाहत असताना गाडेने तिला हेरले. त्याने फलटणला जाणारी बस इथे लागत नाही, पलिकडे लागते असे तिला सांगितले. पीडितेने मी नेहमीच जाते, इथे बस लागते असे सांगत त्याला नकार दिला. यावर त्याने तिचा विश्वास संपादन करत तिला शिवशाही बसजवळ नेले व ही बस जात असल्याचे सांगत तिला त्यात बसण्यास सांगितले. बसमध्ये अंधार असल्याचे तिने म्हणताच त्याने हवे तर तू मोबाईलची लाईट लाव आणि आत पाहून ये, लोक झोपली आहेत, असे सांगितले. यावर ती आतमध्ये जात असताना त्याने तिला मागून पकडले व गळा आवळला. त्यानंतर तिला धमकी देत बलात्कार केला.
बलात्कार करणारा सराईत गुन्हेगार
पुण्यातील या प्रकरणात आरोपी असलेला दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार आहे. पूर्वी जबरी चोरीचे दोन गुन्हे ग्रामीण पोलिसांत दाखल आहेत. आता त्याचा शोध घेण्यासाठी आठ पथके तैनात केली असून, त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी फरार आरोपीला पकडण्यासाठी १ लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे.