Join us

'जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी..'; पुष्कर जोगने मागितली BMC कर्मचाऱ्यांची माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 09:12 IST

pushkar jog: काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण करायला गेलेल्या बीएमसी कर्मचाऱ्यांविषयी पुष्करने वादग्रस्त विधान केलं होतं.

अभिनेता पुष्कर जोग (pushkar jog) याने अलिकडेच बीएमसी (BMC) कर्मचाऱ्यांविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. त्याच्या या विधानामुळे बीएमसी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती. इतकंच नाही तर त्यांनी कारवाई करण्याची मागणीसुद्धा केली होती. या संबंधित प्रकारानंतर आता पुष्करने जाहीरपणे महापालिका कर्मचाऱ्यांची माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेचे कर्मचारी पुष्करच्या घरी मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण करायला गेले होते. यावेळी पुष्करने सोशल मीडियावर तीव्र शब्दांत टीका केली होती. 'जर त्या कर्मचारी बाईमाणूस नसत्या तर, २ लाथा नक्कीच मारल्या असत्या', असं विधान त्याने केलं होतं. त्याच्या याविधानानंतर बराच गदारोळ माजला. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी याविषयी भाष्य केलं. इतकंच नाही तर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तीव्र आक्षेप नोंदवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत 'पुष्करवर गंभीर स्वरुपाचे फौजदारी गुन्हे दाखल करा', अशी मागणीही केली होती.  पुष्करच्या विधानामुळे निर्माण झालेल्या या प्रकारानंतर आता त्याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर करत मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे.

काय म्हणाला पुष्कर जोग?

"मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की, मी केवळ माणूसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी... "अशी प्रकारची पोस्ट करत पुष्करने मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे.

काय होती पुष्करची गदारोळ माजवणारी पोस्ट?

"काल बीएमसीचे काही कर्मचारी माझ्या घरी आले आणि मला सर्व्हे करतोय अशी माहिती देऊन माझी जात विचारत होते. त्या कर्मचारी जर बाईमाणूस नसत्या, तर २ लाथा नक्कीच मारल्या असत्या…कृपया करुन मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाहीत डायरेक्ट कानाखाली मारतील." 

टॅग्स :पुष्कर जोगमराठा आरक्षणसेलिब्रिटीमराठी अभिनेता