मराठमोळ्या नेटकऱ्यांची पहिली पसंती असणारं युट्यूब चॅनेल म्हणजे भाडिपा. दरवेळी प्रेक्षकांसाठी नवनवीन विषय घेऊन येणाऱ्या या चॅनेलचं कोथरुड वर्सेस कोल्हापूर हा नवा सेगमेंट सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. या सेगमेंटच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आलेला सुमित पाटील हा नवोदित कलाकारही प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेला सुमित एक उत्तम मिमस्टर असून सध्याच्या घडीला तो लोकप्रिय मिमस्टरपैकी एक आहे. विशेष म्हणजे Radio City मध्ये जॉब करणारा सुमित अचानकपणे मीम्सच्या क्षेत्रात कसा काय आला आणि तो भाडिपासोबत कसा काय जोडला गेला हे त्याने 'लोकमत ऑनलाइन'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
"ज्यावेळी मी मीम्स तयार करायला सुरुवात केली त्यावेळी भारतात हा प्रकार फारसा रुजला नव्हता. जवळपास ८-९ वर्षांपूर्वी मी आणि माझ्या काही मित्रांनी मिळून एक प्रयोग केला होता. एका हॉलिवूड चित्रपटातला सीन घेऊन तो मराठीत डब केला होता. हा व्हिडीओ त्याकाळी आम्ही फेसबुकवर शेअर केला होता. पण, तेव्हा फेसबुकही फारसं चर्चेत नसल्यामुळे या व्हिडीओनंतर आम्ही परत नवीन प्रयोग केला नाही. त्या व्हिडीओनंतर बरीच वर्ष माझा गॅप पडला. मात्र, क्रिएटिव्ह क्षेत्रातच काही तरी करायचं हे त्याचवेळी मी ठरवलं," असं सुमितने सांगितलं.
मीम्स कसे सुचतात? मिमस्टर सुमित पाटील सांगतो...
पुढे तो म्हणतो, " त्या काळात माझ्या एका मित्राने मला रेडिओमध्ये काम करण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे रेडिओचं पुरेस ज्ञान किंवा कोणतीही पार्श्वभूमी नसताना मी इंटरव्ह्यूला गेलो आणि तिथेच माझं सिलेक्शन झालं. काही वर्ष या रेडिओमध्ये काम केल्यानंतर कोल्हापुरातच Radio City मध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. Radio Cityमध्येच काम करत असताना दुसरीकडे मी मीम्सही करत होतो. याच काळात फेसबुकवरच्या आम्ही मीमकर या पेजसोबत जोडलो गेलो आणि तेथे माझे मीम्स शेअर करु लागलो. कालांतराने रेडिओपेक्षा मीम्सच्या क्षेत्रात काम करताना मला जास्त मज्जा येतीये किंवा आनंद मिळतोय हे मला उमगलं आणि मी करिअर म्हणून या क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला".
...अशी मिळाली सुमित पाटीलला 'भाडिपा'मध्ये एण्ट्री!
दरम्यान, सुमित पाटील हा एक लोकप्रिय मिमस्टर असून सध्या तो भाडिपासारख्या मंचावर झळकत आहे. कोथरुड वर्सेस कोल्हापुर या नव्या सेगमेंटच्या माध्यमातून सुमित पाटील प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.