देशभरात कोरोना व्हायरसचे थैमान वाढत चालले आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. तसेच चित्रपट व मालिकांच्या शूटिंगला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे काही शूटिंग्स इतर राज्यात होते आहे. दरम्यान आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी मनोरंजन क्षेत्रातील अडचणींचा आढावा घेतला. नाट्यसृष्टी, चित्रपटसृष्टी, संगीत, टीव्ही मालिका या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पन्नासहून अधिक मान्यवरांशी राज ठाकरे यांनी ‘झूम’ माध्यमातून संवाद साधला आणि समस्या समजून घेतल्या.
राज्यात चित्रीकरणाला परवानगी मिळावी, राज्यभरातील लोककलावंतांसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, वाद्यवृंद कलावंत आणि बॅकस्टेज कामगारांना अनुदान देण्यात यावे आणि त्यांच्या लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी अशा विविध मागण्या या मीटिंगमध्ये मांडण्यात आल्या. एकपडदा चित्रपटगृहांची अवस्था, सध्या तयार असलेल्या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी काय करता येईल या उपाययोजनांवरही चर्चा झाली. दीड तास चाललेल्या या ‘झूम’ संवादात सर्व समस्या आणि मागण्या राज ठाकरे यांनी नोंदवून घेतल्या आणि यातील तातडीच्या मागण्यांविषयी आपण मुख्यमंत्र्यांशी लगेच संपर्क साधून पाठपुरावा करु असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.