राजेश्वरी सचदेव 'या' सिनेमातून मराठी रुपेरी पडद्यावर करणार कमबॅक, या दिग्गज बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची साकारणार भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 6:27 AM
सध्या अनेक बॉलिवूडचे कलाकार मराठी सिनेमांकडे आकर्षित होत आहेत.मराठी सिनेमांच्या विषयातील जादू आणि दमदार कथानक तसंच तितक्याच ताकदीचे दिग्दर्शन ...
सध्या अनेक बॉलिवूडचे कलाकार मराठी सिनेमांकडे आकर्षित होत आहेत.मराठी सिनेमांच्या विषयातील जादू आणि दमदार कथानक तसंच तितक्याच ताकदीचे दिग्दर्शन यामुळे हिंदी कलाकारांना मराठी सिनेमांची भुरळ पडू लागली आहे.मराठी चित्रपटसृष्टीत सध्या के. के. मेननची भूमिका असलेल्या मराठी सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. 'एक सांगायचं असं' या सिनेमाचं नाव असून मराठमोळा अभिनेता लोकेश गुप्ते या सिनेमापासून दिग्दर्शनाची नवी इनिंग सुरु केली आहे.अभिनेत्री राजेश्वरी सचदेव या सिनेमातून बऱ्याच दिवसांनी मराठी रुपेरी पडद्यावर एंट्री मारणार आहे.राजेश्वरीने 'आयत्या घरात घरोबा' या सिनेमात काम केलं होतं.या सिनेमात तिने अभिनेता सचिन यांच्या बहिणीची भूमिका साकारली होती. यानंतर राजेश्वरीने विविध मालिका आणि रिअॅलिटी शोमध्ये काम केलं आहे.आता पुन्हा एकदा 'एक सांगायचं' सिनेमातून राजेश्वरीचे मराठी रुपेरी पडद्यावर कमबॅक होत आहे.या सिनेमात ती के.के. मेननच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणार असल्याचे कळतंय. या सिनेमाच्या दुसऱ्या शेड्युअलच्या शूटिंगला राजेश्वरीने सुरुवात केली आहे.ऑक्टोबर महिन्यात हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार असून पालक आणि मुलांमध्ये कमी होत चाललेला संवाद या सिनेमात दाखवला जाणार आहे.बदलती जीवनशैली, प्रत्येकाचं बिझी शेड्युअल, मुलांकडून पालकांच्या अपेक्षा, बदलतं जग, पुढे जाण्याची जीवघेणी स्पर्धा,पालक तसंच मुलांचे बदलते विचार, त्याचे पालकांसह मुलांवर होणारे नकारात्मक आणि सकारात्मक परिणाम अशा सगळ्या गोष्टी 'एक सांगायचं' सिनेमातून रसिकांना पाहायला मिळणार आहेत.आपल्या या नव्या इनिंगबद्दल बोलताना के. के. मेनन याने सांगितले की, ‘मराठी चित्रपट मी पाहतो. मराठी चित्रपटाच्या कथा माझ्या मनाला भिडतात. चित्रपटाची कथा मला लोकेशने ऐकवली तेव्हा माझ्या मनाला भिडली. मी क्षणाचाही विलंब न करता लगेचच होकार दिला.महाराष्ट्रात राहत असल्याने मराठी भाषा मी खूप ऐकली आहे. मला मराठी भाषा बोललेली समजते सुद्धा. या चित्रपटासाठी मी मराठीचे धडे गिरवणार आहे, असे त्याने सांगितले.’संजय मेमाणे, पुष्पांक गावडे यांची सिनेमॅटोग्राफी, अभिनेता जितेंद्र जोशीचे गीतलेखन, शैलेंद्र बर्वेचे बहारदार संगीत, नितीन कुलकर्णी यांचे कलादिग्दर्शन आणि चैत्राली लोकेश गुप्ते यांची वेशभूषा या सिनेमाला लाभणार आहे.