Join us  

Ramesh Dev: रमेश देव: चतुरस्र अभिनेता ते देखणा खलनायक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2022 1:01 PM

Ramesh Dev: रमेश देव यांचा जन्म कोल्हापूर येथे ३० जानेवारी १९२९ रोजी झाला. ते मूळचे राजस्थानातील जोधपूरचे, ठाकूर घराण्यातील. राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे त्यांचे नाव ‘देव’ झाले.

रमेश देव यांचा जन्म कोल्हापूर येथे ३० जानेवारी १९२९ रोजी झाला. ते मूळचे राजस्थानातील जोधपूरचे, ठाकूर घराण्यातील. राजर्षी शाहू महाराज यांच्यामुळे त्यांचे नाव ‘देव’ झाले. एका न्यायालयीन कामकाजात रमेश देव यांच्या वडिलांनी महाराजांना मदत केली होती. त्यावेळी महाराज म्हणाले, तुम्ही देवासारखे धावून आलात, तुम्ही देव आहात, तेव्हापासून देव हे नाव रूढ झाले. रमेश देव यांचा विवाह प्रसिद्ध अभिनेत्री सीमा यांच्याबरोबर झाला व पडद्यावर आणि आयुष्यातही जोडी जमली.

रमेश देव ९३ वर्षांचे असून त्यांच्या विवाहाला ५९ वर्षे झाली आहेत. वर्ष १९५७ मध्ये ‘आलिया भोगासी’ या मराठी चित्रपटाद्वारे सीमा व रमेश देव यांनी प्रथम एकत्रित काम केले. त्यानंतर ६ वर्षांनंतर १ जुलै १९६३ रोजी त्यांचा विवाह झाला. सीमा या पूर्वाश्रमीच्या नलिनी सराफ. त्यांची मुंबईत लोकलमध्ये भेट झाली. त्यांचे वडील पृथ्वीराज कपूरचे फॅन होते. एकदा छोट्या रमेशला घेऊन पृथ्वीराज कपूर यांच्या सेटवर गेले होते. त्यावेळी सेटवर काम करणाऱ्या छोट्या मुलाकडून दिग्दर्शकाचे समाधान होईना. तेवढ्यात त्यांचे लक्ष छोट्या रमेशकडे गेले. त्यांनी विचारले, बेटा तू काम करणार का? छोट्या रमेशने होकार दिला व हेच त्यांचे चित्रपटसृष्टीतील पहिले काम. मात्र त्यांनी लगेचच अभिनयाची सुरुवात केली नाही. त्यांनी नाटकात कामे केली.

१९५१ मध्ये ‘पाटलाची पोर’ या चित्रपटात त्यांनी पहिल्यांदा काम केले. त्यांनी १९५६ मध्ये राजा परांजपे दिग्दर्शित ‘आंधळा मागतो एक डोळा’ या मराठी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली. १९६२ मध्ये राजश्री प्रॉडक्शनच्या ‘आरती’ या चित्रपटाद्वारे त्यांनी एक खलनायक म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी ३० मराठी नाटके, १९० हून अधिक मराठी व २८५ हून अधिक हिंदी चित्रपटांतून काम केले. त्यांनी नायक, खलनायक म्हणून कारकीर्द यशस्वी केली. ‘भिंगरी’ चित्रपटात त्यांनी साकारलेला देखणा खलनायक प्रेक्षकांच्या जास्त लक्षात राहिला. ‘आनंद’ चित्रपटामधील राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्याबरोबरील त्यांची डॉक्टरची भूमिकाही खूप गाजली. त्यांनी अनेक चित्रपट, माहितीपट आणि दूरदर्शन मालिकेचे दिग्दर्शन केले.

रमेश देव प्रॉडक्शन मार्फत त्यांनी सर्जा आणि जेता या दोन मराठी सिनेमांची निर्मिती केली होती. जेता (२०१०) या सिनेमासाठी लोकमत माध्यम प्रायोजक होते.

रमेश देव यांच्या निधनामुळे एक चतुरस्र अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. कृष्णधवल काळापासून अलीकडच्या रंगबेरंगी अत्याधुनिक चित्रपटांपर्यंत रमेश देव यांनी प्रदीर्घ कारकिर्द गाजविली. त्यांनी नायक जितका समर्थपणे साकारला तितकाच खलनायकही भेदक शैलीत साकारला. त्यांच्या अनेक चरित्र भूमिकाही स्मरणीय आहेत. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. हिंदी चित्रपटसृष्टीचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या उमेदवारीच्या काळात त्याला मोलाचे सहकार्य त्यांनी केले होते. अमिताभ हे ऋण कधीच विसरले नाहीत. सर्जा, वासुदेव बळवंत फडके अशा अनेक चित्रपटांची निर्मिती, दिग्दर्शन त्यांनी केले. सीमा देव यांच्याबरोबरचे प्रदीर्घ सहजीवन आदर्शवत होते. त्यांचे सुपुत्र अजिंक्य आणि अभिनय यांच्या सोबत आम्ही 'जेता' चित्रपटाची निर्मिती केली होती, त्यात रमेशजी आणि सीमाताई यांनी अप्रतिम भूमिका होत्या, त्या आठवणी अविस्मरणीय आहेत. 'जीवनसंध्या' हा त्यांचा शेवटचा सिनेमा मनाला स्पर्शून जातो. चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटवणाऱ्या या बहुआयामी कलाव॔तास भावपूर्ण श्रद्धांजली.- विजय दर्डा,  चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

टॅग्स :रमेश देवमराठी