रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत असलेल्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. वीर सावरकर यांचा जीवनपट या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर उलगडण्यात आला आहे. या सिनेमात रणदीप हुड्डाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमातील रणदीप हुड्डाच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. तर या सिनेमाचीही सोशल मीडियावरही जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक मराठी कलाकारांनीही या सिनेमाचं कौतुक करत पोस्ट शेअर केल्या आहेत. आता 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा मराठीत प्रदर्शित केला जाणार आहे.
गेल्या आठवड्यात २२ मार्चला 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. हिंदीबरोबरच मराठीतही हा सिनेमा प्रदर्शित होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता मराठीत हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उद्यापासून म्हणजेच शुक्रवारी २९ मार्चपासून 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमा मराठीतून प्रदर्शित केला जाणार आहे. त्यामुळे आता मराठीत स्वातंत्र्याचा वीर इतिहास उलगडला जाणार आहे.
'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमात काम करण्याबरोबरच या सिनेमाचं दिग्दर्शनही रणदीप हुड्डाने केलं आहे. या सिनेमाच्या निमित्ताने त्याने दिग्दर्शनात पाऊल ठेवलं आहे. या सिनेमात अभिनेत्री अंकिता लोखंडेही झळकली आहे. अंकिताने या सिनेमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका साकारली आहे.