'शिमगा' या चित्रपटातील दुसरे गाणे 'रंग तुझा गंध तुझा' नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या रोमँटिक गाण्यात भूषण प्रधान आणि मानसी पंड्या ही नटखट जोडी पहायला मिळत आहे. तर राजेश शृंगारपुरे आणि सुकन्या सुर्वे यांची सोज्वळ, समंजस अशी जोडी दिसत आहे.
'रंग तुझा गंध तुझा' या गाण्यातून नायक आणि नायिका यांच्यामधील प्रेम भाव दिसून येत आहेत. याशिवाय प्रेमाचा सुंदर, तरल अनुभव या गाण्यातून येतो आहे. मुख्य म्हणजे या गाण्यात ढोल ताशांचा वापर केला आहे. त्यामुळे मराठमोळ्या थाटातील हे गाणे सर्वांनाच ठेका धरायला लावणारे आहे. गाण्यात सुरुवातीलाच मानसी ढोल वाजवताना दिसत आहे. मूळची गुजराती असणाऱ्या मानसीचा हा पहिलाच सिनेमा आहे. या गाण्याचे चित्रीकरण कोकणात झाले असून कोकणातील महत्वपूर्ण अशा 'शिमगा' या सणावर आधारित हा चित्रपट आहे. पंकज पडघण यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला सायली पंकज आणि सौरभ साळुंके यांचा आवाज लाभला आहे. तर वलय यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन दिपाली विचारे यांनी केले आहे.
'श्री केळमाई भवानी' प्रॉडक्शनची निर्मित 'शिमगा' हा चित्रपट १५ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन, निर्मिती आणि लेखन निलेश कृष्णाजीराव पालांडे ऊर्फ निलेश कृष्णा यांनी केले आहे. तसेच प्रस्तुतकर्त्याची धुरादेखील निलेश कृष्णा यांनी सांभाळली आहे.