Join us

'रंगा पतंगा' ही स्वतःच्या शोधाची गोष्ट....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2016 7:43 PM

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संत तुकाराम पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार पटकावलेला रंगा पतंगा हा चित्रपट १ एप्रिल रोजी ...

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संत तुकाराम पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार पटकावलेला रंगा पतंगा हा चित्रपट १ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. फ्लाईंग गॉड फिल्म्स व विश्वास मीडिया अँड एंटरटेन्मेंट निर्मित हा चित्रपट बिपीन शहा मोशन पिक्चर्स प्रस्तुत करत आहे. या निमित्ताने चित्रपटाचे चित्रपटाचे पटकथा, संवाद लेखक-दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांच्याशी साधलेला संवाद... दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट प्रदर्शित होत असताना काय भावना आहे ?- खूप आनंद आणि उत्सुकता आहे. आतापर्यंत प्रेक्षक म्हणून चित्रपट पहात होतो, अनेक चित्रपटांविषयी वृत्तपत्र आणि मासिकांतून रसग्रहणात्मक लिहिलं आहे. आता स्वतः दिग्दर्शित केलेला चित्रपट प्रदर्शित होणं ही फार वेगळी भावना आहे. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचं कौतुक झालं. पुरस्कार मिळाल्यावर चित्रपट पाहिलेल्या काही प्रेक्षकांनी   ''आम्हाला आवडलेला चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरल्यानं बरं वाटलं' असं भेटून सांगितलं होतं. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपट आवडतोय, हे त्यावेळी लक्षात आलं. पहिला चित्रपट दिग्दर्शित करताना काय विचार होता ?-  पहिला दुसरा असं काही डोक्यात नव्हतं. चित्रपट हा दोन प्रकारचा असतो. चांगला किंवा वाईट. मला चांगला चित्रपट करायचा होता. अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करून आम्ही हा चित्रपट केला आहे. आता प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांनाही तो आवडेल अशी अपेक्षा आहे.सध्या मराठीत फेस्टिव्हल चित्रपट आणि व्यावसायिक चित्रपट असं चित्र दिसतं आहे. तुमच्या चित्रपटाला महोत्सवात यश मिळालं आहे. आता प्रदर्शित होताना प्रेक्षक त्याला कशा पद्धतीनं स्वीकारतील असं वाटतं ?- महोत्सवात यश मिळवलेला चित्रपट म्हणजे कंटाळवाणा असं नसतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे महोत्सवात यश मिळवलेल्या काही चित्रपटांनी व्यावसायिक यशही मिळवल्याचं अनेकदा दिसून आलं आहे वळू, देऊळ, फँड्री, किल्ला अशी कित्येक उदाहरणं देता येतील. पूर्वी सामना, सिंहासन अशा गंभीर चित्रपटांनीही व्यावसायिक यश मिळवलं होतं. आताच्या काळात व्यावसायिक आणि कलात्मक चित्रपट असं वेगळं काही राहिलेलं नाही. त्यांच्यातील सीमारेषा धूसर झाली आहे. व्यावसायिक आणि कलात्मक यांचा योग्य समन्वय साधणं शक्य असतं. व्यावसायिक चित्रपटांची गिमिक्स वापरलीच पाहिजे असं काही नाही. चांगला आशय तितक्याच चांगल्या पद्धतीनं मांडणं महत्त्वाचं असतं. चांगल्या पटकथेचा वाईट चित्रपट होऊ शकतो. मात्र, चांगल्या पटकथेचा चांगला चित्रपट करण्यासाठी निर्माता, कलाकार, तंत्रज्ञ या सर्वांची योग्य साथ मिळावी लागते. मला 'रंगा पतंगा' करताना सर्वांची साथ मिळाली. त्यामुळे आम्ही चांगला चित्रपट करू शकलो. सध्या देशात गोवंश हत्या, धार्मिक संघर्ष अशा विषयांवर मोठी चर्चा सुरू आहे.  'रंगा पतंगा'तही हा विषय हाताळला आहे. त्याविषयी काय सांगाल ?- चित्रपटाचं काम करताना हे विषय चर्चेत नव्हते किंवा हे विषय चर्चेत येतील असेही वातावरण नव्हते. चित्रीकरण पूर्ण झाल्यावर या सगळ्या विषयांची चर्चा सुरू झाली. चित्रपटात केवळ हेच विषय हाताळलेले आहेत असे नाही. चित्रपटाचा विषय वेगळाच आहे. या निमित्तानं समाज व्यवस्था, राजकारण, अर्थकारण अशा सगळ्या विषयांवर भाष्य करत, चिमटे काढत विषय मांडला आहे. विषय गंभीर असला, तरी त्याची मांडणी हलकीफुलकी आहे. त्यामुळे प्रेक्षक नक्कीच त्याला दाद देतील. एका अर्थानं, हरवलेल्या रंगा पतंगाचा शोध हा आपल्या प्रत्येकाचा शोध आहे. पहिल्याच चित्रपटात मकरंद अनासपुरे, संदीप पाठक, भारत गणेशपूरे यांच्यासारखे कसलेले कलाकार आहेत. या सगळ्यांसह काम करण्याचा अनुभव कसा होता ?-'रंगा पतंगा' दिग्दर्शित करण्यापूर्वी मकरंद अनासपूरे यांनी मी लिहिलेल्या दोन चित्रपटांत अभिनय केला होता. त्यामुळे त्यांचा माझा परिचय होता. माझं लेखन त्यांना आवडतं, हे त्यांनी अनेकदा सांगितलं होतं. त्यामुळे 'रंगा पतंगा'ची पटकथा लिहून झाल्यावर जेव्हा जुम्मनच्या व्यक्तिरेखेसाठी त्यांचं नाव समोर आलं तेव्हा त्यांना हा चित्रपट आवडेल असं वाटलं होतं. त्याप्रमाणे त्यांनीही खूप सकारात्मक प्रतिसाद दिला आणि माझ्या अपेक्षेप्रमाणे आपल्या नेहमीच्या भूमिकांपेक्षा अत्यंत वेगळ्या धाटणीचा अभिनय अत्यंत समरसून केला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या चित्रपटातील मकरंद अनासपूरे, संदीप पाठक, भारत गणेशपूरे, नंदिता धुरी, संकलक सागर वंजारी, साउंड डिझायनर अनमोल भावे, निर्माता सिनेमॅटोग्राफर अमोल गोळे, संगीतकार कौशल इनामदार अशा सगळ्यांनीच अनेक चित्रपट केले आहेत. कथा लेखक चिन्मय पाटणकर आणि माझा हा पहिला चित्रपट आहे. त्यामुळे या सगळ्यांच्या अनुभवाचा चित्रपट करताना खूप फायदा झाला.