अभिनेत्री आणि गीतकार अदिती द्रविडचा नवा अल्बम ‘यु अँड मी’ नुकताच युट्यूबवरून रिलीज झाला आहे. माझ्या नव-याची बायको मालिकेत इशाच्या भूमिकेत दिसणा-या आदिती द्रविडसोबत ह्याच मालिकेत शनायाच्या भूमिकेत दिसलेली रसिका सुनीलही ह्या नव्या म्युझिक अल्बममध्ये दिसत आहेत.
अभिनेत्री-गीतकार आदिती द्रविडने या अगोदर झी टॉकीजसाठी ‘मधु इथे आणि चंद्र तिथे’ हे गाणे लिहिले होते. तसेच यंदाच्या गणेशोत्सवात ‘नमन तुला श्रीगणराया’ हे तिचे गाणे नुकतेच आले होते. आता तिचे हे तिसरे गाणे रसिकांसमोर येत आहे. ‘यु अँड मी’ हे गाणे आदितीने लिहिले आणि गायलेही आहे.
आपल्या नव्या ‘यु अँड मी’ अल्बम विषयी आदिती म्हणते, “मी आणि रसिका घट्ट मैत्रिणी आहोत. आपल्या मैत्रीला समर्पित करणारं एक गाणं घेऊन याव असं वाटतं होतं. त्यामुळे आपोआपच शब्द सुचत गेले. सई-पियुषने संगीतबध्द केलेल्या या गाण्याची कोरिओग्राफी फुलवा खामकरने केली आहे. युथफुल शब्द, त्यालाच साजेसे चित्रीकरण आणि डान्स मुव्हमुळे हे गाणे तरूणाईला आवडेल असं वाटतं. आम्ही जवळजवळ 12 कॉस्च्युम्स या गाण्यात घातले आहेत. एखाद्या बिग बजेट हिंदी फिल्मच्या भव्यतेची अनुभूती हे गाणं पाहताना तुम्हाला येईल.”
साई–पियुष यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे. फुलवा खामकर हिने या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. छायांकन अमोल गोळे यांचे आहे. लोणावळा येथे चित्रित झालेल्या या एका गाण्यासाठी रसिका आणि आदिती यांनी १२ वेगवेगळे ड्रेस परिधान केले आहेत. अभिनयातल्या रंगानंतर रसिका आणि आदितीच्या संगीताचे सूर ही प्रेक्षक पसंतीस उतरतील अशी आशा आहे.