मराठी कलाविश्वातील देखणा अभिनेता म्हणून रविंद्र महाजनी (ravindra mahajani) यांच्याकडे पाहिलं जायचं. अनेक गाजलेल्या मराठी-हिंदी सिनेमांमध्ये झळलेल्या रविंद्र महाजनी यांचं वयाच्या ७७ व्या वर्षी आकस्मित निधन झालं. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वाला धक्का बसला. मात्र, त्यांच्याविषयी माहित नसलेल्या गोष्टीही पहिल्यांदाच समोर आल्या. यामध्येच त्यांची पत्नी माधवी महाजनी यांचं चौथा अंक हे आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालं आहे. या आत्मचरित्रामध्ये त्यांनी रविंद्र महाजनी आणि त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे.
२९ जानेवारी रोजी माधवी महाजनी यांचं चौथा अंक हे आत्मचरित्र प्रकाशित करण्यात आलं. यावेळी गश्मीरने या पुस्तकाची प्रस्तावना वाचून दाखवली. माधवी यांनी रविंद्र महाजनी यांच्या मृत्यूपूर्वीच हे पुस्तक लिहून ठेवलं होतं. मात्र, त्याच काळात अभिनेत्याचं निधन झालं. परंतु, त्यांच्या निधनानंतर माधवी यांनी या पुस्तकात नवऱ्याच्या निधनानंतर आपली कशी अवस्था झाली होती हे सुद्धा नमूद केलं आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्या सासूबाईंसोबत म्हणजे रविंद्र महाजनी यांच्या आईसोबत त्यांचं नातं कसं होतं हे यात सांगितलं आहे.
कसं होतं माधवी यांचं सासूसोबतचं नातं
"वयाच्या २० व्या वर्षी माझं लग्न झालं. माझ्यात आणि सासूबाईंच्या वयात खूप मोठं अंतर होतं. जवळपास ४० वर्षांनी त्या माझ्यापेक्षा मोठ्या होत्या. मी लाडात वाढलेले मुलगी होते. त्यामुळे मला स्वयंपाक करता येत नाही हे सांगायची मला खूप लाज वाटायची. मला साधा चहा सुद्धा करता येत नव्हता. त्यामुळे मग मी घरातली इतर काम करत बसायचे. आणि, सासूबाई स्वयंपाक करायच्या. एक दिवस त्या मला ओरडल्या की इकडे तिकडे करण्यापेत्रा स्वयंपाक कर. त्यांच्या बोलण्याचा मला खूप राग आला होता. त्यामुळे मी सुद्धा असंच त्यांना काही तरी उलट बोलून गेले. त्यामुळे त्यांनी माझ्या आईला बोलवून घेतलं. त्यांच्या बोलण्यावरुन माझी आई सुद्धा घरी आली आणि माझेच कान पिळले. ‘आता हेच तुझं घर आहे आणि ह्याच तुझी आई आहेत’ असं तिने मला सांगितलं", असं माधवी यांनी म्हटलं आहे.
पुढे त्या लिहितात, "त्या दिवसानंतर माझी आणि त्यांच्या छान मैत्री झाली. माझ्या धाकट्या बहिणीच्या मैत्रिणींसोबतही त्यांची मैत्री झाली होती. त्या सगळ्यांसोबत छान रुळल्या. त्यावेळी माझ्या आईने माझे कान पिळले म्हणूनच हे सर्व शक्य झालं”.