मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ नेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. शुक्रवारी(१४ जुलै) संध्याकाळी राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळला. रवींद्र महाजनी यांनी त्यांच्या अभिनयाने ७० ते ९०च्या दशकातील काळ गाजवला. या काळात त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमे मराठी सिनेसृष्टीला दिले. रवींद्र महाजनी यांचा लेक गश्मीर हादेखील लोकप्रिय अभिनेता आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत गश्मीरही अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहे.
रवींद्र महाजनी यांच्या अनेक गाजलेल्या चित्रपटांपैकी देवता हा एक सिनेमा. १९८३ साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा रिमेक झाला तर त्यात गश्मीरने काम करावं, अशी इच्छा रवींद्र महाजनी यांनी व्यक्त केली होती. राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते. “तुमच्या एखाद्या चित्रपटाचा रिमेक झाला आणि त्यात गश्मीरला काम करण्याची संधी मिळाली, तर तो चित्रपट कोणता असावा?”, असा प्रश्न रवींद्र महाजनी यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना त्यांनी देवता चित्रपटाचं नाव घेतलं होतं.
“मी बाबांसारखा हँडसम दिसत नाही, पण...”, गश्मीर महाजनीने वडिलांबाबत केलेलं वक्तव्य होतं चर्चेत
“गश्मीरने प्रत्येक जॉनरच्या चित्रपटात काम करावं, अशी माझी इच्छा आहे. पण, माझ्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये काम करायचं झालं तर तो चित्रपट देवता असावा. त्यात मी साकारलेल्या भूमिकेच्या खूप बाजू होत्या. तो आधी सुशिक्षित असतो, मग डाकू होतो आणि पुन्हा मग महापौर होतो, असा त्या भूमिकेचा प्रवास होता,” असं रवींद्र महाजनी म्हणाले होते.
“मराठी चित्रपटसृष्टीतील एकमेव देखणा नट...”, रवींद्र महाजनी यांच्या निधनाने अशोक सराफ भावुक
गश्मीरला या मुलाखतीत “वडिलांचा आवडता चित्रपट कोणता?” असं विचारण्यात आलं होतं. यावर त्याने “मुंबईचा फौजदार” असं उत्तर दिलं होतं. रवींद्र महाजनी व गश्मीर महाजनी या पितापुत्राची जोडी अनेक सिनेमांमध्ये एकत्र दिसली होती.