Join us

कमिटमेंटचा खरा अर्थ सांगणारी कथा म्हणजे 'आरती - अननोन लव्हस्टोरी'रूपेरी पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 12:06 PM

नात्याची समीकरणे बदलत चालली असताना प्रेम आणि विश्वास यापलीकडच्या माणुसकीच्या नात्यावर भाष्य करणारा 'आरती' हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला ...

नात्याची समीकरणे बदलत चालली असताना प्रेम आणि विश्वास यापलीकडच्या माणुसकीच्या नात्यावर भाष्य करणारा 'आरती' हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. प्रेम,रिलेशनशिप अशा गोष्टी आपण कायम ऐकतो, नात्याचं जुळणं,तुटणं या गोष्टीही आपल्या कानावर पडत असतात आणि पाहतही असतो. मात्र कोणत्याही नात्यात ही कमिटमेंट महत्त्वाची असते. याच कमिटमेंटचा खरा अर्थ सांगणारी कथा म्हणजे 'आरती - अननोन लव्हस्टोरी' हा सिनेमा आहे. नुकतेच या सिनेमाच्या टीमने लोकमतच्या ऑफिसला भेट दिली. आरती - अननोन लव्हस्टोरी हा सिनेमा सत्य घटनेवर आधारित आहे.सनी पवार आणि आरती मकवानाच्या प्रेमाची ही अजब कहाणी आहे.या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सारिका मेणे यांनी उचलली आहे. सारिका मेणे आणि सनी पवार याचं बहिण भावाचे ऋणानुबंध. त्यामुळे सनीचं आयुष्य त्यांनी जवळून पाहिलं होतं. हेच सांगताना सारिका मेणे भावुक झाल्या. सनीची लव्हस्टोरी रुपेरी पडद्यावर यावी हा विचार माझा असला तरी ती कथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे असं त्या म्हणाल्यात. आरती रुग्णालयात दाखल असताना सनीची अवस्था पाहवत नव्हती असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या आयुष्यात आरतीचा खूप मोठा वाटा असून वास्तवात घडलेली ही अनोखी प्रेमकहाणी जगासमोर आणण्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांचं सहकार्य लाभल्याचेही त्यांनी सांगितले. सिनेमात सनी आणि आरतीची भूमिका साकारणा-या कलाकारांची निवड करण्यासाठी भरपूर परिश्रम घ्यावे लागले. ब्रँड नसल्याने अनेकांनी सिनेमात काम करण्यास नकार दिल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. अखेर ऑडिशन घेऊन रोशन आणि अंकिता भोईर यांची निवड केल्याचं त्यांनी म्हटलंय. या दोघांनीही सनी आणि आरती रुपेरी पडद्यावर साकारताना पूर्णपणे न्याय दिला आहे.सिनेमासाठी "एडिटरपासून ते लाइटमनपर्यंत सगळंच नवीन होतं, अशात श्रेयस तळपदेनं खूप मदत केली. सिनेमाचं वितरण काय असते हे देखील माहित नव्हते. यांत सारा क्रिेएशनने खूप मेहनत घेतली" अशी माहिती सारिका मेणे यांनी दिली.या सिनेमात सनी याची भूमिका अभिनेता रोशन विचारे याने साकारली असून अंकिता भोईर हिने आरतीची भूमिका साकारली आहे. सिनेमा सत्य घटनेवर आधारित असल्यामुळे रोशन आणि अंकिता या दोघांसाठी या भूमिका साकारणं अत्यंत भावनिक होतं. आरती आणि सनी पवार या दोघांच्या लव्ह स्टोरीबाबत वाचले होते. युट्यूबवर त्यांचे व्हिडीओ पाहिले होते असं सनीची भूमिका साकारणा-या रोशन विचारे याने सांगितले. मात्र एक प्रेमकथा आता सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर उतरवायची होती, ती लोकांपर्यंत पोहचवण्याचं मोठं आव्हान माझ्यापुढे होते. कथेच्या गरजेनुसार सनीच्या भूमिकेला न्याय देण्यासाठी कधी वजन वाढवले तर कधी कमी केल्याचं रोशनने यावेळी सांगितले. एक सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणारा हा सिनेमा असल्याचे रोशन सांगतो. दुसरीकडे या सिनेमाबाबत तसंच सनी-आरतीच्या ख-याखु-या लव्हस्टोरीबाबत बोलताना अभिनेत्री अंकिता भोईर भावुक झाली. तिला यावेळी अश्रू अनावर झाले होते. सिनेमात अंकिताने आरतीची भूमिका साकारली आहे. या सिनेमात आपल्या वाट्याला फारसे डायलॉग नसले तरी बेडवर पडून इमोशन दाखवल्याचं तिने सांगितले. कथा आणि तिच्यामागची भावना समजून घेत आरती रंगवली असून प्रत्येक सीनमध्ये नवी आरती उलगडत गेल्याचे अंकिताने यावेळी सांगितले. सिनेमाची कथा ज्या सनी पवारवर आधारित आहे त्याने यावेळी आरतीला झालेल्या अपघातानंतरची परिस्थिती सांगितली. 2006 मध्ये कार अपघातात आरतीच्या मेंदूला मार लागल्याने ती कोमात गेली होती. त्यावेळी तिला आधी गोराईच्या रुग्णालयात, नंतर भायंदर आणि त्यानंतर जसलोक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. "दिवसेंदिवस तिच्या उपचाराचा खर्च वाढत होता. दिवसाला दहा हजार रुपये इतका खर्च येत होता. त्याचवेळी वर्तमानपत्रात याबाबतची बातमी दिली. यानंतर काही वाचकांनी मदतही केली. मदत करणा-यांमध्ये वहिदा रेहमानही होत्या. मात्र त्यांनी आपलं नाव कधीही पुढे येऊ दिलं नसल्याचे त्याने सांगितले. आरती कधीच पूर्वीसारखी होणार नाही हे ठाऊक असूनही तब्बल तीन वर्ष 10 महिने सनीने आरतीची सुश्रुषा केली. अखेर 15 जून 2010 रोजी आरतीने जगाचा निरोप घेतला. आरती या जगातून निघून गेल्यानंतर 2013 साली घडलेली एक घटनाही सनीने सांगितली. एके दिवशी वहिदा रेहमान यांचा फोन आला. मी समाजसेवेत गेल्याचे त्यांना माहिती होतं. त्यांनी खंबीरपणे साथ दिल्याचे सनीने यावेळी सांगितले. आरतीने दिलेली प्रेमाची देणगी सनीला पुढे न्यायची आहे.