अभिनेता शशांक केतकर छोट्या पडद्यावरील 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतील श्रीच्या भूमिकेतून घराघरात पोहचला. त्यानंतर त्याने चित्रपट व मालिकांमध्ये विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. आता लवकरच तो चित्रपट 'आरोन'मध्ये व 'हे मन बावरे' या मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याची मालिका व चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शशांकने नुकतेच सोशल मीडियावर त्याला गेले आठ-दहा दिवस कमालीचे गेले असल्याचे सांगितले आहे. नेमके आठ-दहा दिवसात काय झाले हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल ना.शशांक केतकर सोशल मीडियावर लिहिले की, 'आरोन' या माझ्या इंडो फ्रेंच चित्रपटाचा ९ सप्टेंबरला वॉश्गिंटनला प्रीमियर झाला. आता २३ सप्टेंबरला लॉस अँजेलिसला या सिनेमाचा प्रीमियर आहे. तसेच कलर्स मराठी वाहिनीवरील हे मन बावरे मालिकेची अनाउंसमेंट झाली. १५ सप्टेंबरला माझा व १६ सप्टेंबरला प्रियांकाचा वाढदिवस झाला. बापरे! हे गेले आठ-दहा दिवस खरेच कमालीचे होते. रोज काही ना काही कारणाने शुभेच्छा आणि आशिर्वाद मिळत होते आई बाबांचे, नातेवाईकांचे, मित्र मंडळींचे आणि तुम्हा सर्वांचे सुद्धा. हे प्रेम असच राहू दे .
शशांक केतकर 'आरोन' चित्रपटात एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. अद्याप या सिनेमाच्या कथेबाबतची सविस्तर माहिती गुलदस्त्यातच आहे. शशांकसोबतच या सिनेमात नेहा जोशी, अथर्व पाध्ये यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असून अभिनेत्री स्वस्तिका मुखर्जीचा हा पहिला मराठी सिनेमा आहे. ओमकार शेट्टी यांनी या सिनेमाच्या लेखन –दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.'हे मन बावरे' या मालिकेच्या निमित्ताने शशांक व मृणाल दुसानिस पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या मालिकेत प्रेमकथा पाहायला मिळणार असून शशांक व मृणाल यांची केमिस्ट्री छोट्या पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.