Join us  

​या कारणामुळे सिद्धार्थ जाधवला आला राग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 11:06 AM

सिद्धार्थ जाधवची मुख्य भूमिका असलेले गेला उडत हे नाटक प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षकांची ...

सिद्धार्थ जाधवची मुख्य भूमिका असलेले गेला उडत हे नाटक प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या नाटकाच्या प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षकांची तुडुंब गर्दी असते. या नाटकाचे दिग्दर्शन केदार शिंदेचे असून या नाटकाची पहिल्या दिवसापासूनच प्रचंड चर्चा आहे. बेला शिंदे यांच्या थर्डबेल प्रॉडक्शन्स आणि प्रसाद कांबळी यांच्या भद्रकाली प्रॉडक्शन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने या नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकाच्या माध्यमातून अभिनेता सिद्धार्थ जाधव हा बऱ्याच काळाने रंगभूमीवर परतला आहे. त्याच्या नेहमीच्या शैलीतला निखळ विनोद आणि धमाल कथानक हे गेला उडतचे वैशिष्ट्य आहे. पहिल्या प्रयोगापासूनच प्रेक्षकांनी या नाटकाला भरभरून दाद दिली आहे. या नाटकाचा प्रयोग काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे होणार होता. पण काही कारणास्तव शेवटच्या क्षणी या नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला. सिद्धार्थ जाधव चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने सिद्धार्थने या नाटकाचा प्रयोग रद्द केला असे कोल्हापूरमधील लोकांना आयोजकांनी सांगितले. पण या गोष्टीत काहीही तथ्य नसल्याचे सिद्धार्थचे म्हणणे आहे. सिद्धार्थ या नाटकाच्या प्रयोगासाठी कोल्हापूरला रवाना देखील होणार होता. पण आयोजकांनीच हा प्रयोग रद्द केला असल्याचे सिद्धार्थ सांगतो.सिद्धार्थ जाधवचे नाव वापरून आयोजकांनी गेला उडत या नाटकाचा प्रयोग रद्द केला असल्याने सिद्धार्थ चांगलाच चिडला आहे. हा प्रयोग त्याने रद्द केला नसल्याचे त्याने त्याच्या फेसबुकच्या अकाऊंटवरून सांगितले आहे. त्याने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, आज रविवारी आमचा गेला उडतचा कोल्हापूर मध्ये प्रयोग होता. पण आयोजकांनी अचानकपणे तो रद्द केला.. (आम्ही शनिवारी रात्रीच कोल्हापूरला निघणार होतो). आणि कोल्हापूरच्या रसिकांपर्यंत अशी बातमी पसरवली की, सिद्धार्थ जाधव शुटिंग मध्ये व्यस्त असल्यामुळे प्रयोग होऊ शकत नाही... मुळात मला अगोदर तारीख देण्यात आली होती.. मग मी त्यादिवशी शुटिंगसाठी तारीख का घेऊ? नाटकातल्या मुख्य नटाचं नाव पुढे केले की, आपलं काम सोपं होतं असं जर आयोजकांना वाटत असेल तर ते साफ चुकीचे आहे... उगाचच मायबाप रसिकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतात. कोल्हापुरच्या रसिकांना आयोजक सांगतील की नाही मला माहीत नाही. पण मी हे सांगू इच्छितो की, माझ्यामुळे नाही तर आयोजकांनी अचानक प्रयोग रद्द केल्यामुळे आमचा प्रयोग होऊ शकला नाही. Also Read : ​सिद्धार्थ जाधव आणि त्याची लेक इराची जुगलबंदी पाहिलीत का?