सांगली : ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर सांगलीच्या दिग्दर्शक शेखर बापू रणखांबे यांनी नाव कोरले आहे. त्यांच्या ‘रेखा’ या लघुपटाला नॉन फ़िक्शन गटात ‘स्पेशल ज्युरी पुरस्कार प्राप्त झाला.
शेखर रणखांबे हे तासगाव तालुक्यातील पेड येथील आहेत. त्यांनी सामाजिक विषयावर अनेक माहितीपट बनविले आहेत. रेखा या लघुपटात रस्त्याकडे जगणाऱ्या महिलांच्या आरोग्याचा विषय हाताळण्यात आला आहे. या महिला स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. या लघुपटात मासिक पाळीच्या काळात आरोग्याच्या वाईट स्थितीकडे लक्ष वेधले आहे.
या लघुपटात कलाकार, तंत्रज्ञ सांगलीतील आहेत. या लघुपटाने जगभर डंका गाजविला आहे. सांगली परिसरातील भाजी मंडई, बसस्टॉप आदी परिसरात लघुपटाचे चित्रीकरण झाले आहे. गतवर्षी भारतीय चित्रपट महोत्सव गोवा (इफ्फी) येथे लघुपटाची अधिकृत निवड झाली. महाराष्ट्र शासनाच्या स्वराज्य लघुपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट फिल्म, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री असे तीन पुरस्कार मिळाले होते.
पुणे येथील आरोग्य फेस्टिव्हल, द एम्प्टी फिल्म फेस्टिव्हल, अक्षर मानव लघुपट महोत्सव, अरुणोदय फिल्म फेस्टिव्हल अहमदनगर, प्रतिबिंब फिल्म फेस्टीव्हल, लोकराजा राष्ट्रीय लघुपट महोत्सव असे अनेक महोत्सव या लघुपटाने गाजवले आहेत. गेल्या महिन्यातच जर्मनीतील बर्लिन फेस्टिव्हलमध्येही या लघुपटाला दोन पुरस्कार मिळाले आहेत. तर स्टुअर्टगार्ड व मेलबोर्न फेस्टीवलसाठीही त्याची निवड झाली होती.या लघुपटामध्ये सांगलीतील माया पवार, तमीना पवार, सत्याप्पा मोरे, वैशाली केंदळे, विशाल शिरतोडे, उमेश मालन, कुलभूषण काटे, गौतम कांबळे, अनुराधा साळुंखे, गजानन सूर्यवंशी, सूरज वाघमोडे आदींचा सहभाग आहे.