वेद आणि विज्ञान यांच्यातील संबंध दर्शविणारा 'कानभट' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्या अपर्णा एस. होशिग यांनी नुकतेच या चित्रपटाची पहिली झलक शेअर केली. या चित्रपटात अभिनेता भाव्या शिंदे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच या चित्रपटातून अपर्णा दिग्दर्शनात पदार्पण केले आहे.
अपर्णा एस होशिग यांनी गेल्या ९ वर्षात बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांसाठी काम केले आहे. ‘जिना है तो ठोक डाल’, ‘उटपटंग’ आणि निल नितीन मुकेशची प्रमुख भूमिका असलेला ‘दशेरा’ या तीन चित्रपटांची निर्मिती देखील अपर्णा यांनी केली आहे. आता नवीन काही तरी करु पाहणाऱ्या अपर्णा ‘कानभट’ या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शिकाच्या भूमिकेत पहिल्यांदाच दिसणार आहेत. या चित्रपटाबद्दल अपर्णा यांनी सांगितले की, “मराठी चित्रपट आता सातासमुद्रापार पोहचला आहे. नवीन बेंचमार्क्स त्याने तयार केले आहे. मराठी चित्रपटांची प्रशंसा आता सर्वत्र होत आहे. माझ्या चित्रपटाची गोष्ट एका तरुण मुलाचे स्वप्न आणि त्याच्या इच्छा यावर आधारित आहे. पण नियतीने त्याच्यासाठी काही वेगळ्या गोष्टी प्लॅन केल्या आहेत ज्याच्यासाठी तो वेगळ्या मार्गाचा वापर करत आहे. या चित्रपटाची गोष्ट वेद आणि विज्ञान यांच्यातील संबंध दर्शविते आणि हीच चित्रपटाची शैली आहे.”भोर राजवाडा, मुंबई आणि उत्तराखंड येथे शूट झालेल्या या चित्रपटाला संगीत राहुल रानडे यांनी दिले असून गाण्याचे बोल गुरु ठाकूर यांनी लिहिले आहेत आणि अरुण वर्मा हे डीओपी आहेत. मीराज अली यांनी या चित्रपटाचे संकलन केले आहे तर सतिश चिपकर यांनी कला दिग्दर्शनाची जबाबदारी पेलली आहे. हा चित्रपट यावर्षी म्हणजेच २०१९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.