लेखिका इरावती कर्णिक यांच्या वेगे वेगे धावू या एकांकिकेवर आधारीत ‘परी हूँ मैं’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा मोशन पोस्टर नुकताच लाँच करण्यात आला. यातून या चित्रपटातील पात्रांची ओळख करून देण्यात आली आहे. हा चित्रपट 7 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
चित्रपट, टीव्ही मालिका, रिएलिटी शो या चंदेरी दुनियेचा विषय लेखिका इरावती कर्णिक यांनी ‘वेगे वेगे धावू’ या एकांकिकेमधून मांडला होता, त्यावर आधारीत ‘परी हूँ मैं’ हा चित्रपट आहे. त्या एकांकिकेचे दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केले होते. तर ‘परी हूँ मैं’ या चित्रपटाची पटकथा मच्छिंद्र बुगडे, रोहित शिलवंत आणि संकेत माने यांची असून संवाद योगेश मार्कंडे यांचे आहेत. अभिनेते नंदू माधव, देविका दफ्तरदार, बालकलाकार श्रुती निगडे, फ्लोरा सैनी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात ग्लॅमरस दुनियेची अत्यंत हटके सफर घडवली आहे.
‘परी हूँ मैं’च्या मोशन पोस्टरमध्ये एका खिडकीतून घरात विसावलेले दिघे कुटुंब टी.व्ही. बघताना दिसतेय, त्या कुटुंबाची इवलीशी सदस्य साजरी दिघे आपल्याशी संवाद साधत तिला आवडणारा समुद्र, गोष्टी सांगणे आणि तिचे जगातील बेस्ट बाबा म्हणजेच माधव दिघे यांच्या आणि तिच्या आईबद्दल म्हणजेच कल्पना दिघे यांच्या विषयी तिच्या मनात असणारी थोडीशी भीती आणि प्रेमही ती बोलताना व्यक्त करते. तसेच सर्व प्रेक्षकांना ही गोड साजरी तिच्या कुटुंबाची गोष्ट अर्थात ‘परी हूँ मैं’ हा चित्रपट बघण्यासाठी निमंत्रित करत आहे. ही छोटी साजिरी नेमकी काय गोष्ट घेऊन येणार याची प्रेक्षकांच्या मनात उत्कंठा निर्माण झाली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून या चंदेरी दुनियेमध्ये नक्की काय असतं? याची सत्यता प्रेक्षकांसमोर येईल.