Takatak 2 : रिलायन्स एंटरटेन्मेंट स्टुडिओ ‘टकाटक 2’द्वारे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे. ‘टकाटक ’चा फ्रेंचायजीचा सीक्वल असलेल्या मिलिंद कवडे दिग्दर्शित ‘टकाटक 2’साठी रिलायन्सने ‘पर्पल बुल एंटरटेन्मेंट’शी हातमिळवणी केली आहे. 2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘टकाटक’ने बॉक्स ऑफिसवर 14.5 कोटीचा गल्ला जमवला होता. ‘टकाटक 2’द्वारे पर्पल बूल एंटटेन्मेंटसह आमच्या असोसिएशनचे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश करण्याच्या दिशेनं एक पाऊल असल्याचं रिलायन्स एंटरटेन्मेंटचे बिझनेस हेड सुनील वाधवा म्हणाले.
मराठीमध्ये आशयघन आणि दर्जेदार सिनेमे तयार होतात. येथे पदोपदी प्रतिभासंपन्नता दिसून येते. मार्केटिंग आणि टॅलेंट यांच्यातील नातेसंबंध मजबूत करणं आणि गेम चेंजर बनून परिघाबाहेर जाऊन ट्रेंड सेट करणं, हे आमचं ध्येय आहे. ‘टकाटक 2’च्या प्रमोशनसाठी आम्ही सुबोध भावे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते या प्रौढ विषयावर आधारित चित्रपटासाठी पाठिंबा देतील की नाही, ही शंका होती. मात्र, सुबोध यांनी पुढाकार घेतला आणि मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश करणाऱ्या कॉपोर्रेट जगताला पाठिंबा देण्याचं कबूल केलं आणि आम्हाला मोठा दिलासा मिळाला, असं वाधवा म्हणाले.
तुफान विनोदासह सामाजिक संदेश : निर्माता ओमप्रकाश भट्टमी हिंदी आणि मराठीमध्ये एकाच वेळी कार्यरत आहे. मराठीमध्ये मी यापूर्वी ‘ये रे ये रे पैसा’, ‘ये रे ये रे पैसा 2’ आणि ‘टकाटक’ हे तिन ब्लॉकबस्टर सिनेमे दिले आहेत. आता ‘टकाटक 2’ घेऊन येतो आहे. मराठीमध्ये काम करताना भन्नाट मजा येते. येथील कलाकार स्वयंस्फुर्त असून प्रतिभासंपन्न आहेत. त्यामुळे, त्यांच्याशी काम करताना आनंद वाटतो. आणखी दोन-तिन स्क्रिप्ट तयार असून, ‘टकाटक 2’नंतर त्यावर काम सुरू करेन. ‘टकाटक’ हा एक विनोदी आशयासह सामाजिक संदेश देणारा सिनेमा होता. हा सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर उपलब्ध असून, त्याच्या पुढील भाग म्हणजे ‘टकाटक 2’ असल्याचे चित्रपटाचे निर्माता ओमप्रकाश भट्ट यांनी सांगितलं.
‘टकाटक 2’चा ट्रेलर पाहिलात की नाही? : सुबोध भावे
‘टकाटक 2’चा ट्रेलर पाहिल्यावर सिनेमाच्या प्रेमात पडलेला सुबोध म्हणाला, ‘खरं सांगायचं तर ‘टकाटक’ पाहण्यापूर्वी त्या सिनेमाबाबत माझा खूप गैरसमज झाला होता. हा सिनेमा पाहिल्यावर गैरसमज दूर झाला. सामाजिक बांधिलकी जपत बनवण्यात आलेला अॅडल्ट-कॉमेडी असलेला हा सिनेमा असून, आता हा सिनेमा आणखी मोठा झाला आहे. ‘टकाटक 2’चा ट्रेलर भन्नाट असून, उत्सुकता ताणली गेली आहे. हा ट्रेलर बघा आणि 18 ऑगस्टला ‘टकाटक 2’ सिनेमागृहांमध्ये येऊन बघा. मी स्वत: फर्स्ट डे फर्स्ट शो बघणार असून तुम्हीही माझ्यासोबत असाल अशी खात्री असल्याचे सुबोध भावे म्हणाला.
‘हृदयी वसंत फुलताना...’ ‘टकाटक 2’चं प्रमोशनल साँग‘टकाटक 2’च्या प्रमोशनसाठी ‘हृदयी वसंत फुलताना...’ हे मराठी सिनेसृष्टीतील सदाबहार गाणं नवा साज घेऊन रसिकांच्या भेटीला येणार आहे. या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत गाजलेल्या गीतांचा प्रमोशनल साँग म्हणून वापर करण्यासोबत नवनवीन संकल्पनांचा नवा ट्रेंड ‘टकाटक 2’च्या टीमने सेट केला आहे. त्यामुळे भविष्यात आणखी काही नवीन चित्रपट हा ट्रेंड वापरून नवीन चित्रपटांना जुन्या गाण्यांच्या सौंदर्याची जोड नक्कीच देतील.
‘टकाटक 2’चे संवादलेखन किरण बेरड आणि संजय नवगिरे यांनी केलं आहे. या चित्रपटात प्रथमेश परब, अजिंक्य राऊत, प्रणाली भालेराव, अक्षय केळकर, भूमिका कदम, कोमल बोडखे, सुशांत दिवेकर, स्वप्नील राजशेखर, किरण माने, पंकज विष्णू, किरण बेरड, आरजे महेश काळे, स्मिता डोंगरे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. जय अत्रे यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार वरुण लिखते यांनी संगीतसाज चढवला आहे.