मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक म्हणजे महेश कोठारे. आजवरच्या कारकिर्दीत महेश कोठारे यांनी अनेक गाजलेल्या चित्रपट, मालिकांची निर्मिती केली आहे. यात खासकरुन १९९० च्या काळातील त्यांचे असंख्य चित्रपट सुपरहिट झाले. आजही त्यांच्या या चित्रपटांना प्रेक्षकांकडून प्रेम मिळतं. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे माझा छकुला. १९९४ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि लोकप्रिय झाला. या चित्रपटातील नायकांसोबतच गिधाड ही खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेताही चर्चेत आला. त्यामुळे ही भूमिका नेमकी कोणी साकारली होती ते जाणून घेऊयात.
'माझा छकुला' हा चित्रपट आजही अनेकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटात अभिनेता आदिनाथ कोठारे याने बालकलाकाराची भूमिका साकारली होती. विशेष म्हणजे गिधाडाशी दोन हात करणाऱ्या आदिनाथ त्या काळी चांगलाच चर्चेत आला होता. परंतु, त्याच्यासोबतच त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करणारा गिधाडदेखील प्रेक्षकांच्या स्मरणात राहिला.
विजय चव्हाण, महेश कोठारे, लक्ष्मीकांत बेर्डे अशा दिग्गज कलाकारांच्या मांदियाळीत गिधाड ही भूमिका अभिनेता बिपीन वर्टी यांनी साकारली होती. बिपीन आणि महेश कोठारे यांच्यात खूप चांगली मैत्री होती. त्यामुळे महेश कोठारे यांच्या अनेक चित्रपटांमध्ये बिपीन यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे.बिपीन वर्टी यांनी केवळ माझा छकुला या एकाच चित्रपटात नव्हे तर मराठीतील अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'झपाटलेला', 'आमच्यासारखे आम्हीच', 'अशी ही बनवाबनवी', 'एक गाडी बाकी अनाडी', 'फेका फेकी', 'धुमधडाका', 'गंमत जंमत' सारख्या गाजलेल्या चित्रपटात बिपीन यांनी भूमिका साकरल्या आहेत.