Join us

रेमो डिसोझा करणार मराठी चित्रपटाची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2017 8:21 AM

रेमो डिसोझा आज एक डान्सर, कोरिआग्राफर, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिका पार पाडत आहे. रेमोने अफलातून या चित्रपटाद्वारे ...

रेमो डिसोझा आज एक डान्सर, कोरिआग्राफर, अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भूमिका पार पाडत आहे. रेमोने अफलातून या चित्रपटाद्वारे एक अभिनेता म्हणून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याने बॉलिवूड ड्रीम्स या चित्रपटातील गाणी कोरिओग्राफ केली. तुम बिन, साथियाँ, कांटे यांसारख्या चित्रपटातील त्याच्या कोरिओग्राफीची चांगलीच चर्चा झाली आणि त्याने कोरिओग्राफीत आपले प्रस्थ निर्माण केले. डान्स इंडिया डान्स, झलक दिखला जा, डान्स प्लस या कार्यक्रमामुळे तर रेमोला चांगलीच लोकप्रियता मिळाली. कोरिओग्राफीनंतर रेमो दिग्दर्शनाकडे वळला. फालतू, एबीसीडी, एबीसीडी 2, फ्लाइंग जट, एबीसीडी 3 यांसारख्या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले. रेमोने डेथ ऑफ अमर या छोट्या बजेटच्या चित्रपटाची निर्मिती केली होती. आता राघव जुयाल, धर्मेश येलंडे आणि पुनित पाठक यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या नवाबजीद या चित्रपटाची तो निर्मिती करत आहे तर त्याच्या दुसऱ्या चित्रपटात शक्ती मोहन आणि सलमान युसूफ खान प्रमुख भूमिकेत आहेत. हिंदी चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर तो मराठी चित्रपटाची निर्मिती करण्याच्या विचारात आहे.मराठी चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक सरस विषय हाताळले जात असल्याने रेमो मराठी चित्रपटाची निर्मिती करण्याचा विचार करत आहे. याविषयी रेमो सांगतो, मराठीत खूपच चांगले चित्रपट बनवले जात आहेत. अतिशय चांगल्या विषयांवराचे मराठी चित्रपट केवळ मराठी नव्हे तर अमराठी लोकांचेदेखील लक्ष वेधून घेत आहेत. आणि त्यामुळे मी मराठी चित्रपटाची निर्मिती करण्याचा विचार केला आहे. मी सध्या अनेक पटकथा वाचत आहे. पुढील काही महिन्यात मी चित्रपटावर काम करायला सुरुवात करणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन कोण करणार तसेच या चित्रपटात कोण कलाकार असणार याबाबत सध्या तरी काही विचार केलेला नाही. पुढील काळात यावर काम करायला सुरुवात करणार आहे.