हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना बऱ्याचदा सोशल मीडियावर केलेल्या विधानामुळे व फोटोंमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अभिनेत्री रेणुका शहाणे देखील आपले मत परखडपणे सोशल मीडियावर व्यक्त करीत असतात. त्यामुळे बऱ्याचदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण, त्या ट्रोल करणाऱ्या व्यक्तींनादेखील सडेतोड उत्तर देताना दिसतात. मात्र नुकतेच त्या शहाणे आडनावामुळे त्यांना सोशल मीडियावर नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय.
बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनला नुकतीच सुरूवात झाली आहे. या शोमध्ये अभिनेत्री किशोरी शहाणे सहभागी झाल्या आहेत. पण, सोशल मीडियावर किशोरी शहाणे ऐवजी रेणुका शहाणे यांना टॅग केलं जाते. त्यामुळेच त्रस्त झालेल्या रेणुका शहाणे यांनी ट्विटरवर संताप व्यक्त केलाय.त्यांनी ट्विट केले की, ‘मी किशोरी शहाणे नाही आणि मी बिग बाॅसमध्ये नाही. माझा ह्या कशाशीच काहीही संबंध नाही! कृपया मला टॅग करू नका. समाज माध्यमांचा गैरवापर टाळा. आणि कृपया विचार करा.’