Join us

वडील आणि मुलाच्या नात्याची गोष्ट सांगणारा 'रिंगण'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2017 6:45 AM

'रिंगण' या चित्रपटाच्या टीमने चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नुकतीच लोकमत ऑफिसला भेट दिली. या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने, प्रमुख कलाकार ...

'रिंगण' या चित्रपटाच्या टीमने चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नुकतीच लोकमत ऑफिसला भेट दिली. या चित्रपटाचे दिग्दर्शक मकरंद माने, प्रमुख कलाकार शशांक शेंडे आणि बालकलाकार साहिल जोशी यांनी लोकमतला चित्रपटाविषयी माहिती दिली. 
 
दिग्दर्शक मकरंद माने यांनी चित्रपटाची पटकथा लिहिण्यापासून 'कान्स'या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवापर्यंत 'रिंगण'चा झालेला प्रवास उलगडला. ते म्हणाले की 'रिंगण'ची कथा कोणा सुपरहिरो विषयी नाही. ही एका शेतकरी बापाची व आईच्या प्रेमाला पारख्या झालेल्या मुलाची गोष्ट आहे. 'शेतकरी व आत्महत्या' हे समीकरणच झालेले दिसून येते. हा चित्रपट त्याही पुढे जाऊन शेतकऱ्यांच्या जगण्यावर, वडील आणि मुलाच्या नात्यावर, पंढरपूरच्या भक्तिभावावर भाष्य करतो. हा चित्रपट प्रत्येकासाठीच 'अंतर्मनाचा शोध' ठरेल. ते म्हणाले की, हा चित्रपट जेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात होता त्यावेळी तो इतक्या लांब पल्ल्याचा प्रवास करेल असे वाटले नव्हते. मी फक्त तो प्रत्येक बाजूने परिपूर्ण कसा होईल यासाठी प्रयत्न करत होतो. या सिनेमामध्ये कोणी अभिनेत्री नसल्याने निर्माता शोधण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. परंतु मला हीच गोष्ट सांगायची आहे यावर मी ठाम होतो. 
 
अभिनेते शशांक शेंडे यांनी या सिनेमाविषयी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, या चित्रपटातून नुसते प्रश्नच मांडलेले नाहीत तर त्यांची उत्तरेही शोधली आहेत. शेतकऱ्याची कथा असली तरीही तोच तोपणा या चित्रपटात नाही. माणसातल्या चांगुलपणावर हा चित्रपट आधारित आहे. शशांक शेंडे यांनी इराणी सिनेमामध्येही काम केले आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटातील भूमिकांविषयी व मानसिकरित्या त्या पात्रांमध्ये गुंतण्याविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, कोणतीही भूमिका ही त्रयस्थपणे करावी लागते. त्या गोष्टी जरी आपल्या जीवनाशी निगडीत असल्या तरीही त्या पात्रांमध्ये मानसिकरित्या गुंतून चालत नाही. 
 
मकरंद माने सांगतात, "२००७ साली या चित्रपटाची खरी सुरुवात झाली. त्यावेळी मी तांत्रिक गोष्टी शिकत होतो. सिनेमाचे बजेटिंग करताना, प्रोड्युसर शोधत असताना बरेचदा निराशा होत होती. मग विठ्ठल पाटील, गणेश फुके, महेश येवले, योगेश निकम आणि  मी मिळून हा सिनेमा निर्मिला आहे. दरम्यान सिनेमा प्रस्तुत करण्यासाठी  आम्हाला  लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल यांची  विशेष  साथ मिळाली. त्यामुळे 'टॅलेंट फंड'च्या जोरावर हा सिनेमा बनला असे आपण म्हणू शकतो. या चित्रपटाच्या गाण्यांना अजय गोगावले, आदर्श शिंदे अशा दिग्गज गायकांचा आवाज मिळाला आहे . 'आला डोळ्यात उजेड' हे गीत खास ऐकण्यासारखे आहे. या गाण्यांमधून सिनेमाची गोष्ट पुढे जाते. जर ऑस्करपर्यंत हा चित्रपट पोहोचला तर आमच्या सर्वांच्या कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटेल." 
 
अभिनेते शशांक शेंडे यांनी वर्ल्ड सिनेमा व इंडियन सिनेमा यांचे तुलनात्मक स्पष्टीकरण केले. ते म्हणाले," समाजाच्या प्रतिक्रियांचा फरक वर्ल्ड सिनेमा व इंडियन सिनेमामध्ये दिसून येतो. भारतीय सिनेमात कोणत्याही गोष्टीला तीव्र स्वरूपात दाखविले जाते. याउलट वर्ल्ड सिनेमामध्ये एखादी गोष्ट सहजपणे घडते आहे असे दाखविले जाते. त्यामुळे आपोआपच या सिनेमाला स्वीकारण्याची सामाजिक मानसिकता भारतात आणि जगात वेगवेगळी दिसून येते. 'कथा सांगण्यातला साधेपणा' हा दोघांमधला समान धागा आहे. 'रिंगण' या चित्रपटाला वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चित्रपट महोत्सवांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. अमराठी किंवा परदेशी प्रेक्षकांकडूनही मिळालेला चांगला प्रतिसाद हे या चित्रपटाचे यश आहे असे मी मानतो."
 
छोटा अबडू आणि त्याच्या बाबांची ही गोष्ट लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि माय रोल मोशन पिक्चर्स निर्मित 'रिंगण' या चित्रपटाद्वारे शु्कवारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.