सर्वत्र निवडणुकांचे वारे जोरात वाहात आहेत... जुनं बुलंद नेतृत्व थोडं बाजूला राहून नव्या नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी धुरंधर राजकारणी या निवडणुकीत कंबर कसताना दिसतायेत. निवडणुकीच्या याच पार्श्वभूमीवर ग्रामीण राजकारणाच वास्तवादी चित्र घेऊन वायाकॉम१८ स्टुडीओज आपल्या भेटीला घेऊन येत आहे नवा चित्रपट. वायाकॉम१८ स्टुडीओज प्रस्तुत आणि वायाकॉम१८ स्टुडीओज - उदाहरणार्थ निर्मित आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद माने दिग्दर्शित “कागर” हा चित्रपट येत्या २६ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. पहिल्याच चित्रपटातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली प्रसिध्द अभिनेत्री रिंकू राजगुरू तब्बल तीन वर्षानंतर रसिकांच्या भेटीला येतेय. ‘तळपत्या उन्हात झळाळून निघणार, तिच्या स्वप्नांचा गुलाल उधळणार, जुना जाणार तेव्हाच नवा येणार’ किंवा जुना जाणार तेंव्हाच नवा येणार” अशा आरोळ्या देत रिंकू राजगुरू “कागर” च्या या प्रचारच्या रणधुमाळीत नव्या जोशात उतरलीय. चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.
ग्रामीण राजकारण, महिला सबलीकरण आणि आजच्या समाजकारणाचे वास्तवादी चित्रण करणाऱ्या या चित्रपटात रिंकू राजगुरू अत्यंत सशक्त भूमिकेत रसिकांना दिसणार आहे. तर शुभंकर तावडे हा नवोदित अभिनेता या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण करतो आहे. परिस्थितीच्या वेगवेगळ्या कसोट्यांवर नात्यांची वीण घट्ट बांधून ठेवतं ते प्रेम आणि नात्यातल्या विश्वासाला वैयक्तिक स्वार्थासाठी उपयोगात आणतं ते राजकारण. एककीडे हळूवार प्रेम आणि दुसरीकडे राजकारणाचा पट मांडणारा आणि वास्तवाला थेट जाऊन भिडणारा हा “कागर” २६ एप्रिलपासून रुपेरी पडद्यावर दाखल होतोय.