ब्रिटनमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाचा एक नवा प्रकार आढळून आला आहे. या प्रकारामुळे कोरोनाचा प्रसार जलद गतीने होत आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. ब्रिटनमध्ये लॉकडाऊन असल्याने बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार आणि तंत्रज्ञ तिथे अडकले आहेत.
सैराट फेम रिंकू राजगुरू देखील ब्रिटनमध्ये अडकली असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये देण्यात आले होते. रिंकू तिच्या एका मराठी चित्रपटासाठी लंडनला चित्रीकरण करायला गेली असून तिथे ती अडकली असल्याचे म्हटले जात होते. पण या वृत्तावर अखेर रिंकूच्या कुटुंबियांनी खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांना बंदी असल्यामुळे आमची मुलगी लंडनमध्ये अडकली असल्याचे वृत्त काही वृत्तवाहिन्यांमध्ये आम्ही पाहिले आहे. पण ही गोष्ट खोटी आहे. रिंकू लंडनला काही महिन्यांपूर्वी तिच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेली होती. पण ती गेल्या महिन्यात परतली असून ती सध्या पुण्यात आहे.
रिंकू सध्या तिच्या आगामी ‘छुमंतर’ सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत असून या चित्रपटात रिंकूसोबत प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी, ऋषी सक्सेना आणि बालकलाकार श्रीनिवास पोकळेदेखील आहेत. या चित्रपटाचं लंडनमध्येही शुटिंग करण्यात आलं आहे.
'सैराट' सिनेमानंतर रिंकू राजगुरू हिने रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. इतकंच नाही तर 'सैराट' या सिनेमासाठी तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. एका रात्रीत रिंकू महाराष्ट्रात लोकप्रिय झाली. सैराटच्या यशानंतर रिंकूने कधीच मागे वळून पाहिलं नाही. या चित्रपटानंतर रिंकू राजगुरूचा फॅन फॉलोव्हिंगदेखील चांगलाच वाढला. रिंकू सोशल मीडियावर सक्रिय असून ती तिथून चाहत्यांशी संवाद साधत असते. रिंकू राजगुरू हंड्रेड या हिंदी वेबसीरिजनंतर आता अनपॉज्ड या चित्रपटात दिसणार आहे.