अभिनेत्री रिंकू राजगुरूचा नुकताच २०वा वाढदिवस होता. रिंकूचा जन्म ३ जून २००१ रोजी अकलूजमध्ये झाला. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाने सिनेइंडस्ट्रीला रिंकू राजगुरू ही नवीन अभिनेत्री मिळून दिली. अभिनयाशी काहीही संबंध नसताना रिंकूने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर सैराटमधून प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. इतकेच नाही तर पदार्पणातच तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
रिंकूला आपण सगळे पहिल्या चित्रपटापासून रिंकू या नावानेच ओळखतो. पण तुम्हाला माहीत आहे का, रिंकूचे खरे नाव रिंकू नाही तर प्रेरणा आहे. रिंकूचे खरे नाव प्रेरणा महादेव राजगुरु असे आहे. पण मराठी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये तिला प्रेरणा नव्हे तर रिंकू याच नावाने ओळखले जाते.
सैराट चित्रपटानंतर रिंकूने कागर, मेकअप या मराठी चित्रपटात काम केले. या चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही. त्यानंतर तिने लारा दत्ता सोबत हंड्रेड या वेबसीरिजमध्ये काम केले. या सीरिजमध्ये तिने साकारलेली नेत्रा पाटील प्रेक्षकांना चांगलीच भावली. तसेच ती अनपॉज्ड या डिजिटल प्लॅटफॉर्मवरील हिंदी चित्रपटात पहायला मिळाली. या चित्रपटात पाच लघुपट असून त्यातील रॅट-ए-टॅटमध्ये ती दिसली होती.
रिंकू राजगुरूला सैराट चित्रपटातून एका रात्रीत लोकप्रियता मिळाली. आजही ती आर्ची या नावाने ओळखली जाते. तिला पाहण्यासाठी आजही लोक गर्दी करतात. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षात रिंकूने सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केले. या चित्रपटाला नुकतीच पाच वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटानंतर रिंकूने मागे वळून पाहिले नाही.
रिंकू राजगुरू लवकरच बॉलिवूडमध्येही पदार्पण करणार आहे. ती अमिताभ बच्चन यांच्या झुंड या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळेने केले आहे. तसेच ती छुमंतर या मराठी चित्रपटातही काम करताना दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये पार पडले. तसेच आता लॉकडाउन होण्यापूर्वी रिंकूने मुंबईत जस्टिस डिलिवर्ड या सीरिजचे शूटिंग केले. यात ती अमोल पालेकर यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.