Akash Thosar Birthday : सगळ्यांना याड लावणारी आर्ची अन् परश्याच्या जोडीची बातचं न्यारी. आजही या जोडीची चर्चा होताना दिसते. आम्ही बोलतोय ते रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) व आकाश ठोसर (Akash Thosar) यांच्याबद्दल. आज आकाश त्याचा २९ वा वाढदिवस साजरा करतोय. आता लाडक्या परश्याचा वाढदिवस अन् आर्चीच्या शुभेच्छा नाहीत, असं कसं होणार? आकाशच्या वाढदिवसानिमित्त आर्ची अर्थात रिंकू राजगुरूने त्याच्यासाठी खास इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. सध्या त्याचीच चर्चा रंगली आहे. रिंकूने आकाशसोबतचे दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत आकाश हसतोय आणि रिंकू काहीशी लाजतेय. दुसऱ्या फोटोत रिंकू हसतेय आणि आकाश तिच्याकडे प्रेमानं बघतोय. 'पवित्र आत्म्यास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज आणि उद्या सगळं काही बेस्ट फक्त तुझ्याचसाठी... ,' असं रिंकूने हे फोटो शेअर करत लिहिलंय.
रिंकूची ही स्टोरी बघून साहजिकच चाहते सैराट झाले आहेत. कारण गेल्या अनेक दिवसांपासून रिंकू व आकाश एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. मध्यंतरी रिंकू आकाशसोबत डिनर डेटवर गेली होती. यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अर्थात असं काहीही नसल्याचं रिंकूने लगेच स्पष्ट केलं होतं. मी अद्यापही सिंगल आहे, असं चाहत्यांशी संवाद साधताना तिने स्पष्ट केलं होतं. पण आकाशच्या वाढदिवशी रिंकूनं शेअर केलेल्या स्टोरी बघून पुन्हा एकदा या जोडीच्या प्रेमाच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता दोघं खरंच प्रेमात आहेत की रिंकू म्हणते त्याप्रमाणे दोघं फक्त चांगले मित्र आहेत, ते कळेलच.
'सैराट' या चित्रपटाच्या सेटवर रिंकू आणि आकाशची भेट झाली होती. चित्रपटातील हा जोडी प्रचंड गाजली. आकाशने त्यानंतर अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट, वेब सीरिजमध्ये काम करत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. लवकरच तो 'घर बंदूक बिरयानी' चित्रपटात दिसणार आहे. रिंकूनेही 'सैराट'नंतर अनेक चित्रपटांत काम केलं.