ऋषिकेश वानखेडे, राजेश श्रृंगारपुरेची मुख्य भूमिका असलेल्या गोट्या या चित्रपटात केले जाणार या खेळावर भाष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2018 5:38 AM
बालपणीच्या गोट्या खेळण्याच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या असतील. मोबाईल विश्वात हरवलेल्या आजच्या छोट्या पिढीला गोट्या आणि त्यांचा खेळ ...
बालपणीच्या गोट्या खेळण्याच्या आठवणी आजही अनेकांच्या मनात ताज्या असतील. मोबाईल विश्वात हरवलेल्या आजच्या छोट्या पिढीला गोट्या आणि त्यांचा खेळ कसा असतो हे कदाचित ठाऊक नसलं तरी गोट्यांचा खेळ त्यांना खऱ्या अर्थाने लवकरच समजणार आहे. बालपणी जीवापाड जपत खेळलेल्या गोट्यांकडे व्यावहारिक जगात केवळ ‘टाइमपास’ म्हणून पाहिलं जात असलं तरी या मानसिकतेला छेद देत गोट्या हा खेळ कसा उत्तम आहे हे ‘गोट्या’ या आगामी मराठी सिनेमात पाहायला मिळणार आहे.केतनभाई सोमैया प्रस्तुत, विहान प्रोडक्शन द्वारा मोशन पिक्चरची निर्मिती असलेल्या ‘गोट्या’ची कथा-पटकथा-संवाद-गीतलेखन-दिग्दर्शन भगवान पाचोरे यांनी केले आहे. जय केतनभाई सोमैया या सिनेमाचे निर्माते असून, नैनेश दावडा आणि निशांत राजानी सहनिर्माते आहेत. 'गोट्या' या शीर्षकावरून या सिनेमाची कथा एखाद्या लहान मुलाभोवती गुंफण्यात आली असावी असा अंदाज लावला जाणं साहजिक असलं तरी हा सिनेमा पूर्णतः गोट्या या खेळावर आधारित आहे. शीर्षकाप्रमाणेच गोट्यांचा खेळच खऱ्या अर्थाने या सिनेमाचा नायक आहे.अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या भगवान वसंतराव पाचोरेने गोट्यांच्या खेळाला अपेक्षित मान-सन्मान मिळवून देण्याच्या उद्देशाने या सिनेमाचे लेखन-दिग्दर्शन केले आहे. केवळ मैदानावरच नव्हे तर बोलीभाषेतही गोट्या कायम उपेक्षितच राहिल्या आहेत. ‘गोट्या खेळणं’ हे रिकामटेकड्यांचे काम... ‘गोट्या खेळायला आलो’ म्हणजे टाइमपास करायला आलोय का..? या अर्थाने बोलीभाषेत आजही गोट्यांचा वापर केला जातो. हे चुकीचे असून गोट्या हा बुद्धी तल्लख करणारा आणि शारीरिक कौशल्य दाखवणारा खेळ असल्याचे बालपणापासून गोट्यांसाठी जणू वेडे असलेल्या पाचोरे यांचे म्हणणं आहे. गोट्या या खेळाला आपल्या देशात जरी दर्जा दिला जात नसला तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र या खेळाला महत्त्वाचे स्थान असून ‘गोट्या’ या सिनेमात तेच दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पाचोरे सांगतात. ऋषिकेश वानखेडे, राजेश श्रृंगारपुरे, सयाजी शिंदे, आनंद इंगळे, कमलाकर सातपुते, सुरेखा कुडची, हेमांगी राव, शरद सांखला, शशांक दरणे, पोर्णिमा आहिरे, विजय साळवे, जस्सी कपूर, धनंजय वाबळे, निलेश सुर्यवंशी, नेल्सन लिआओ, कृष्णा, श्लोक देवरे, अविष्कार चाबुकस्वार, धनुष पाचोरे, कृष्णा विजयदत्ता, मनोज नागपुरे, स्मिता प्रभू, वंदना कचरे, पल्लवी ओढेकर, राजेंद्र घुगे आदी कलाकारांच्या या सिनेमात भूमिका आहेत. छायांकन बाशालाल सय्यद यांनी केले असून, राहुल भातणकर यांनी संकलन केले आहे. संगीत दिग्दर्शन अवधूत गुप्तेचे तर नृत्य दिग्दर्शन गणेश आचार्य यांचे आहे. रोहित नागभिडे यांनी या सिनेमाला पार्श्वसंगीत दिले आहे. बाबासाहेब पाटील आणि विशाल चव्हाण या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत. ६ जुलै ला ‘गोट्या’ सिनेमा प्रदर्शित होणार आहे.Also Read : रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपूरे यांच्या नात्याबाबत अखेर त्याच्या पत्नीने सोडले मौन...