कलाकार : रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख, जिया शंकर, अशोक सराफ, विद्याधर जोशी, शुभंकर तावडे, खुशी हजारे, रवीराज केंडे, विनीत शर्मा, विक्रम गायकवाड, अविनाश खेडेकरदिग्दर्शक : रितेश देशमुखनिर्माते : जिनिलीया देशमुखशैली : रोमँटिक ड्रामाकालावधी : दोन तास ३४ मिनिटेस्टार : साडेतीन स्टार चित्रपट परीक्षण : संजय घावरे
'वेड' चित्रपटाच्या रूपात 'मजिली' या तेलुगू चित्रपटाचा मराठी रिमेक रसिकांच्या भेटीला आला आहे. रितेश देशमुखचं पहिलं वहिलं दिग्दर्शन, जिनिलीया देशमुखची मराठीतील एंट्री आणि अजय-अतुलचं संगीत अशा बऱ्याच कारणांमुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. रितेशनं प्रेक्षकांच्या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न केल्याचं चित्रपट पाहिल्यावर जाणवतं. दोन्ही नायिकांसोबतची रितेशची अफलातून केमिस्ट्री सर्वात मोठा प्लस पॅाइंट आहे.
कथानक : क्रिकेट खेळण्यात पटाईत असणारा सत्या आणि त्याच्या सच्चा प्रेमाची ही गोष्ट आहे. शेखरअण्णा नावाचा गुंड सत्याचा पक्का वैरी आहे. तो का आणि कसा याची कथा चित्रपट पाहिल्यावरच समजेल. सत्याचे श्रावणीसोबत लग्न झालेलं आहे. लग्नाला सात वर्षे होऊन दोघांमध्ये एक दरी आहे. बेकार असलेला सत्या कायम दारू आणि सिगारेटच्या नशेत असतो. रेल्वेत काम करणारी श्रावणी त्याला दारूसाठी पैसे देते, सासरे काही बोलले तरी पतीच्या बाजूने बोलते, पतीसाठी वडीलांसोबतही भांडते. असं असूनही सत्या आणि श्रावणीमध्ये दुरावा का याची उत्तरं १२ वर्षांपूर्वीच्या फ्लॅशबॅकमध्ये मिळतात, जी थिएटरमध्ये पहायला मजा येईल.
लेखन-दिग्दर्शन : प्रेम तूही केलंस आणि मीही... प्रेम तुझ्यातही आहे आणि माझ्यातही... ज्याचं आपल्यावर प्रेमच नाही त्याच्यावर प्रेम करायचं दुखणं तुम्हाला नाही कळणार... हे आणि असे बरेच प्राजक्त देशमुख यांनी लिहिलेले अर्थपूर्ण संवाद चित्रपट संपल्यानंतरही मनात रुंजी घालतात. प्रेमाच्या लढाईत क्रिकेट आणि त्यातलं राजकारणही असलं तरी प्रेमावर फोकस करण्यात आला आहे. मुख्य भूमिका आणि दिग्दर्शनातील ताळमेळ रितेशनं अचूकपणे साधला आहे. अशोक सराफ यांनी आपल्या मजेदार शैलीद्वारे चित्रपटात ह्युमर आणला आहे. विद्याधर जोशींसोबतची त्यांची जुगलबंदी पाहण्याजोगी आहे. अजय-अतुल आणि गुरू ठाकूर यांनी कथेच्या प्रवाहाशी एकरूप होणारं गीतलेखन केलं असून, अजय-अतुलनं आपल्या अनोख्या शैलीत श्रवणीय संगीत दिलं आहे. कला दिग्दर्शनात बऱ्याच उणीवा राहिल्या आहेत. एक-दोन दृश्यांमध्ये मोबाईल आणि स्कूटरवरील नंबर प्लेट पाहिल्यावर नेमका कोणता काळ दाखवण्याचा प्रयत्न केला ते समजत नाही. डॅाल्बी अॅटमाॅसमध्ये साऊंड इफेक्टसचा अनुभव घेताना पैसे वसूल होतात. कॅमेरा आणि सिनेमॅटोग्राफी सुपर आहे. पार्श्वसंगीत, संकलन, फाईट सिक्वेन्स, लोकेशन्स परफेक्ट आहेत.
अभिनय : एकाच व्यक्तिरेखेतील दोन छटा रितेशनं मोठ्या खुबीनं सादर केल्या आहेत. रितेश आणि जिनिलीया यांचे वेगवेगळे तीन लुक चित्रपटात आहेत. जिनिलीया एक कसलेली अभिनेत्री असून, मराठीत पदार्पणातच भाव खाऊन गेली आहे. जिया शंकरही आपल्या अभिनयानं प्रभावित करते. एक वेगळेच अशोक सराफ यात आहेत. विद्याधर जोशींनी साकारलेलं कॅरेक्टरही छान आहे. मित्राच्या भूमिकेत शुभंकर तावडेनं सुरेख रंग भरला आहे. सर्वांवर भारी ठरलीय ती सरप्राईज पॅकेज असलेली बालकलाकार खुशी हजारे. रवीराज केंडेनं रंगवलेला खलनायक लक्षात राहण्याजोगा आहे. विनीत शर्मा, विक्रम गायकवाड, अविनाश खेडेकर यांनीही चांगलं काम केलं आहे. सलमान खानसोबतचं गाणं चांगलं झालं आहे.
सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, गीत-संगीत, साऊंड इफेक्टस, सिनेमॅटोग्राफीनकारात्मक बाजू : कला दिग्दर्शनातील उणीवा, मूळ चित्रपटाशी तुलना होण्याची भीतीथोडक्यात : प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमी जीवांची ही गोष्ट प्रेमातील नव्या पैलूंवर प्रकाशझोत टाकणारी आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सादर केलेली ही लव्हस्टोरी एकदा अवश्य पहायला हवी.