Bigg Boss Marathi Season 5 : नव्या रुपात, नव्या ढंगात 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व (Bigg Boss Marathi Season 5) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदाच्या पर्वाचा होस्ट लयभारी अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आहे. तर, दुसरीकडे यंदाच्या सीझनमधील स्पर्धकांच्या नावाची उत्सुकता वाढली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक असणार याची चर्चा सुरू झाली आहे. यातच एका लोकप्रिय मराठी अभिनेत्यानं तो यंदाच्या पर्वात सहभागी होणार असल्याची मोठी हिंट दिली आहे.
मराठीतील लोकप्रिय अभिनेत्यानं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामधून 'बिग बॉस मराठी'च्या घरात जाणार असल्याचं त्याने स्वत:च शिक्कामोर्तब केलं आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर शुभंकर तावडे (Shubhankar Tawde) आहे. शुभंकरने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहलं, 'हा season काहीतरी वेगळा असणार आहे. मी पावसाबद्दल बोलतोय की आणखी काहीतरी वेगळे आहे? जे काही असेल पण मी कुठेतरी नक्की जाणार आहे'.
शुंभकरच्या शेवटच्या वाक्यात 'Whatever it is I will bb definitely going somewhere'. या वाक्यातील 'Be' या शब्दाच्या जागी त्याने 'bb' असा शब्द वापरला आहे. तसेच त्यांने पहिल्या वाक्यात season हा शब्द वापरला आहे. त्याच्या या शब्दप्रयोगावरुन शुभंकर 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये एन्ट्री घेणार असल्याचं बोललं जातं आहे.
एवढंच नाही तर दोन दिवसांपुर्वी कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक प्रोमो रिलीज करण्यात आला होता. या प्रोमोमधून 'बिग बॉस मराठी'च्या घरात जाणाऱ्या एका कलाकाराबद्दल हिंट देण्यात आली होती.
ज्यामध्ये "वेड लावणारं प्रेम तर याच्या कडून शिकावं, पण हा आहे तरी कोण?" असं म्हटलं होतं. या पोस्टबरोबर रितेश देशमुखच्या वेड सिनेमातील 'वेड लावलंय' हे गाणंही जोडलं होतं. 'वेड' सिनेमात रितेशच्या मित्राच्या भूमिकेत शुभंकर होता. त्यावरुन चाहत्यांनी अंदाज बांधला होता की, शुभंकर हा बिग बॉसच्या घरात जाणार. आता अखेर शुभंकरच्या पोस्टनंतर तो बिग बॉसच्या घरात जाणार हे जवळपास नक्की झालं आहे.