शाहरुख खानचा 'पठाण' रिलीज झाला आणि या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. साेमवारपर्यंत या चित्रपटाने ४९५.०५ कोटींची कमाई केली. वर्ल्डवाईड या चित्रपटाने ९५० कोटींचा गल्ला जमवला. अर्थात २० दिवसानंतर 'पठाण'चं वेड कमी होताना दिसतेय. पण 'वेड' (Ved Marathi Movie) या सिनेमाचं वेड मात्र संपायची चिन्हं नाहीत. रितेश देशमुख (Riteish Deshmukh) व जिनिलिया देशमुखचा (Genelia Deshmukh) 'वेड' हा मराठी सिनेमा अद्यापही चित्रपटगृहांत आहे आणि प्रेक्षकांचं प्रेम मिळवत आहे.
'वेड'च्या बॉक्स ऑफिस कमाईचे नवे आकडे समोर आले आहेत. 'वेड'ची जादू अद्यापही कायम आहे, हेच या आकड्यांवरून सिद्ध होतंय. मुंबई फिल्म या रितेशच्या प्रॉडक्शन कंपनीने 'वेड'च्या कमाईचे ताजे आकडे दिले आहेत. त्यानुसार, 'वेड'ने जगभरात ७३. ५० कोटींचा गल्ला जमवला आहे. देशात या चित्रपटाने ६०.२४ कोटींचा बिझनेस केला आहे.
'वेड' हा सिनेमा ३० डिसेंबरला रिलीज झाला. पहिल्या दिवसापासूनच या सिनेमावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्यात. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने २ कोटी २५ लाखांचा गल्ला जमवला होता. त्यानंतर रिलीजनंतरच्या पहिल्या आठवड्यात २० कोटींचा पल्ला गाठला. दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाने ४० कोटी तर तिसऱ्या आठवड्यात ५० कोटींचा टप्पा पार केला. आता 'वेड' ८० कोटींकडे वाटचाल करत आहे. मराठीमध्ये सर्वाधिक कमाई करणारा 'वेड' हा दुसरा सिनेमा ठरल्या. पहिल्या क्रमांकावर अर्थात अजूनही नागराज मंजुळेंंचा 'सैराट' आहे.
'वेड' पाहण्याची आणखी एक संधीआता सिनेप्रेमींसाठी 'वेड' पाहण्याची आणखी एक संधी आहे. ती सुद्धा अतिशय माफक दरात. होय, १३ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारीदरम्यान अत्यंत कमी दरात 'वेड' प्रेक्षकांना पाहता येणार आहे. महाराष्ट्रभरातील सर्वच चित्रपटगृहांत एकाच किमतीत हा सिनेमा दाखवण्यात येईल. खुद्द रितेशने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे. हे आमच्याकडून चाहत्यांना 'व्हॅलेन्टाइन स्पेशल गिफ्ट' असल्याचं रितेशने म्हटलं आहे. 'वेड' बघा आणि आपला व्हॅलेन्टाईन डे खास बनवा... ९९ रूपयांत तिकिट बुक करा, असं रितेशने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे, ही ऑफर १३ ते १६ फेब्रुवारीदरम्यान असणार आहे.