रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलियाच्या (Genelia Deshmukh) 'वेड' या मराठी सिनेमाने तुफान यश मिळवलं. या सिनेमातून रितेशने दिग्दर्शनातही पदार्पण केलं. मराठी सिनेमाने जगभर डंका गाजवला. 50 दिवस थिएटरमध्ये चाललेल्या सिनेमाने 74 कोटींची कमाई केली. नुकताच सिनेमाचा टेलिव्हिजन प्रिमिअरही पार पडला. त्यालाही तुफान प्रतिसाद मिळाला. अभिनेते विद्याधर जोशी (Vidyadhar Joshi) यांनी 'वेड' सिनेमात जिनिलियाच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यांच्यासाठी रितेशने खूपच कौतुकास्पद काम केलं आहे.
अभिनेते विद्याधर जोशी ज्यांना मराठी इंडस्ट्रीत बाप्पा म्हणून ओळखतात ते मध्यंतरी फुप्फुसाच्या आजाराने हॉस्पिटलमध्ये होते. विद्याधर जोशींची भेट घेण्यासाठी रितेश रुग्णालयात गेला. तेव्हा अभिनेते म्हणाले की मला आपला पिक्चर थिएटरमध्ये जाऊन पाहता येणं शक्य नाही. मग काय, रितेशने लगेच सिनेमा हॉस्पिटमध्येच सिनेमा दाखवण्याची व्यवस्था केली. अशा प्रकारे विद्याधर जोशींना सिनेमा पाहण्याचा आनंद घेता आला. रितेशने केलेल्या या कृतीचं खूपच कौतुक होत आहे.
काही दिवसांपूर्वी विद्याधर जोशी यांच्यावर फुप्फुस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना गेल्या तीन वर्षांपासून श्वसनाचा त्रास होत होता. वैद्यकीय तपासणीत त्यांना इडिओपॅथिक पल्मोनरी फायब्रोसिसच्या आजाराचं निदान झालं. त्यांच्यावर ऑक्सिजन थेरपी सुरु करण्यात आली. मात्र नंतर त्यांच्यावर फुप्फुस प्रत्यारोपण करण्यात आलं. आता त्यांची प्रकृती सुधारली आहे.