Join us

​रितेश देशमुख सांगतोय फास्टर फेणे हा माझ्या हृदयाजवळचा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2017 4:39 AM

भा रा भागवत यांचा मानसपुत्र असलेला फास्टर फेणे २७ ऑक्टोबरपासून आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. जिनिलिया आणि रितेश ...

भा रा भागवत यांचा मानसपुत्र असलेला फास्टर फेणे २७ ऑक्टोबरपासून आपल्याला रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. जिनिलिया आणि रितेश देशमुख यांच्या मुंबई फिल्म कंपनी आणि झी स्टुडिओज यांची निर्मिती असलेला आदित्य सरपोतदार दिग्दर्शित फास्टर फेणे हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या निमित्ताने एका पंचतारांकित हॉटेल मध्ये आयोजित केलेल्या खास पत्रकार परिषदेत या चित्रपटातील प्रोमोशनल गाण्याचे अनावरण करण्यात आले. या धमाल फाफे गाण्याला पत्रकार परिषदेत उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला फास्टर फेणे अर्थांत अमेय वाघ, गिरीश कुलकर्णी, पर्ण पेठे, सिद्धार्थ जाधव, चिन्मयी सुमीत, बालकलाकार शुभम मोरे, लेखक क्षितिज पटवर्धन, दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, संगीतकार अर्को यांची उपस्थिती लाभली. फास्टर फेणे या पात्राला ट्रिब्युट म्हणून या चित्रपटाचा निर्माता रितेश देशमुखने या प्रोमोशनल गाण्याची संकल्पना मांडली. स्वतः रितेश देशमुखने या गाण्याला स्वरबद्ध केले आहे आणि तो आपल्या खास नृत्यशैलीत प्रेक्षकांना भुरळ घालण्यास सज्ज आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांची पावलं थिरकायला लावणाऱ्या या गाण्याला संगीतबद्ध केले आहे, हिंदी चित्रपटसृष्टीतल्या प्रसिद्ध संगीतकार अर्को मुखर्जी यांनी तर गाण्याचे गीतकार प्रशांत इंगोले यांनी आपले शब्द या गाण्याला दिले आहेत. अर्को यांनी कपूर & सन्स, बरेली कि बर्फी, रुस्तम यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांना संगीत दिले आहे. त्यांच्या या मराठीतल्या पहिल्याच प्रयत्नाला भरभरून प्रतिसाद मिळेल अशी आशा त्यांनी कार्यक्रमात व्यक्त केली. सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सीझर गोन्साल्विस यांनी खास शैलीत नृत्यदिग्दर्शन केले आहे.या कार्यक्रमाच्या वेळी रितेश देशमुखने पत्रकारांशी संवाद साधला. तो म्हणाला, फास्टर फेणे हा चित्रपट माझ्या हृदयाजवळचा चित्रपट आहे. हे मी माझे भाग्य समजतो की, मला फास्टर फेणे मोठया पडद्यावर घेऊन येण्याची संधी मिळाली. या फिल्मचा जॉनर लक्षात घेता या चित्रपटात गाण टाकणे कठीण होते, परंतु मला प्रमोशनल गाणे करण्याची आणि ते गाण्याची संधी मिळाली याचे खरंच समाधान वाटत आहे. Also Read : फास्टर फेणेचा निर्माता रितेश देशमुख का चिडला अमेय वाघवर?