नुकताच लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल लागला. अनेकांना वाटत होतं की, भाजपा यंदाच्या निवडणुकीतही बहुमत मिळवेल. पण या निवडणुकीत कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीने चांगलीच मुसंडी मारलीय. भाजपाचे वर्चस्व असलेल्या अनेक ठिकाणी कॉंग्रेसला मोठे यश मिळाले आहे. अशातच निवडणुकीच्या रणधुमाळीत अभिनेता रितेश देशमुखने त्याचे वडील आणि दिवंगत कॉंग्रेस नेते विलासराव देशमुख यांचा एक व्हिडीओ शेअर केलाय.
विलासरावांचा व्हिडीओ नेमका काय?
विलासरावांचा एका सभेत भाषण करतानाचा हा व्हिडीओ आहे. या भाषणात विलासराव म्हणतात, "लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस इतकं विस्तारित रूप काँग्रेसला प्राप्त झालंय. अनेकांनी प्रयत्न केला काँग्रेसला संपवायचा. ते संपले काँग्रेस नाही संपली. एवढा प्रचंड इतिहास काँग्रेसला आहे. त्यागाचा, बलिदानाचा. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास या काँग्रेसला आहे. काँग्रेसने नेहमीच गरिबांचा विचार केला. काँग्रेसका हाथ आम आदमी के साथ, ही काँग्रेसची भूमिका आहे. आम आदमी म्हणजे सामान्य माणूस."
विलासराव पुढे म्हणतात, "काँग्रेसचा हात केवळ श्रीमंतांबरोबर असं नाही म्हटलं काँग्रेसने. आम आदमी म्हणजे समाजातल्या प्रत्येक जाती धर्मातला गरीब माणूस. ही भूमिका काँग्रेसने शिकवली. कालपर्यंत 33 % आरक्षण होतं आता 50% झालं. आमच्या भगिनींना आता जिल्हापरिषद, नगरपरिषद, कॉर्पोरेशन या प्रत्येक ठिकाणी लोकसंख्येच्या ५० % मानाचं स्थान काँग्रेसने प्राप्त करून दिलं. काँग्रेस कामाच्या बळावर मत मागतेय. आश्वासनांच्या बळावर नाही. बाकीचे लोक आश्वासनांवर मत मागतायत. आम्ही विचारांवर आणि केलेल्या कामांवर मत मागतोय. उजळ माथ्याने तुमच्यासमोर येऊन मत मागण्याचा नैतिक अधिकार हा काँग्रेसकडे आहे."