महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची आज जयंती आहे. त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने देशमुख कुटुंबीयांनी विलासरावांच्या आठवणींना उजाळा दिला. विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर संपुर्ण देशमुख कुटुंब पोहचलं. याचे काही फोटो रितेश देशमुखने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
रितेशनं वडिलांच्या जयंतीनिमित्त भावुक पोस्ट शेअर केली. रितेशने स्मृतिस्थळावरील काही फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. या फोटोंना 'वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा…' असं कॅप्शन त्यानं दिलं. रितेशने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये संपुर्ण देशमुख कुटुंब दिसून येत आहे. एका फोटोत रितेशची दोन्ही मुले राहील आणि रियान हे आपल्या आई-बाबांसह विलासराव देशमुख यांना आदरांजली देत नमस्कार करताना पाहायला मिळत आहेत. हे फोटो पाहून चाहतेही भावूक झाले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहिली.
रितेश अनेकदा आपल्या वडिलांच्या आठवणी सोशल मीडियावर शेअर करत असतो. गेल्या फेब्रुवारी महिन्यात विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा लातूरमध्ये पार पडला होता. यावेळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले. या कार्यक्रमात रितेश देशमुखने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. बोलत असतानाच वडिलांची आठवण सांगताना रितेशला हुंदका अनावर झाला आणि त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. दरम्यान, विलासराव देशमुख यांचा जन्म 26 मे 1945 रोजी महाराष्ट्रातील बाभलगाव नावाच्या गावात झाला होता. काँग्रेस नेते विलासराव देशमुख यांनी दोन वेळा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलं होतं. 14 ऑगस्ट 2012 रोजी त्यांचं निधन झालं होतं.