अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख (Genelia D'souza-Deshmukh) हे सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. २००३ साली हे कपल तुझे मेरी कसम या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. ते आता २०२२ मध्ये वेड (Ved Marathi Movie) या सिनेमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या दोघांना पहिल्या सिनेमापासून ते आतापर्यंत एकत्र काम करून २० वर्ष पूर्ण झाली असून नुकतंच याचं सेलिब्रेशनही करण्यात आलं. रितेश-जिनिलीयाने मीडियासोबत याचं सेलिब्रेशन केलं. यावेळी रितेशने जिनिलीयासाठी मराठमोळा उखाणा तर घेतलाच आहे पण त्याचबरोबरच त्याने तो उखाणा घेण्यामागची एक स्टोरी देखील सांगितली. रितेश म्हणाला की, १९९५ सालची ही गोष्ट आहे. मी गावी क्रिकेट खेळायचो. ग्रामीण भागात क्रिकेटचे सामने ठेवायचो. तेव्हा तिथे पर्सनल कॉमेंटर असायचा. त्याचं लग्न होतं. त्याच्या लग्नात आम्ही गेलो. लग्नाला फक्त ३०-४० जण होते. त्यावेळी त्याला तिथे जो उखाणा घ्यायला सांगितला होता. तो उखाणा मी आज घेणार आहे. उखाणा घेतल्यानंतर मला जज करू नका त्याला करा. भाजीत भाजी मेथीची, जिनिलिया माझ्या प्रीतीची.
रितेश - जिनिलियाचा वेड चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या सर्वत्र या चित्रपटाचीच चर्चा सुरू आहे. हा सिनेमा जिनिलियाचा पहिलाच मराठी सिनेमा असल्याने तिच्या मराठीचं ही बरंच कौतुक होताना दिसत आहे. वेड चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसतो आहे. पहिल्या दिवशी या सिनेमाने २.२५ कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी हा आकडा ३.२५ कोटींवर आणि तिसऱ्या दिवशी ४.५० कोटींवर पोहोचला. तीनच दिवसांत या सिनेमाने एकूण १० कोटी कमाई केली आहे. चौथ्या दिवशी म्हणजे सोमवारी चित्रपटाने ३.०२ कोटींचा गल्ला जमवला आणि काल मंगळवारी पाचव्या दिवशी २.६५ कोटींचा बिझनेस केला.