रोहन गुजर करतोय अॅक्टिव्ह पॅसिव्ह या लघुपटात काम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2017 12:16 PM
होणार सून मी या घरची या मालिकेतील पिंट्या या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला रोहन गुजर सध्या बन मस्का या मालिकेत ...
होणार सून मी या घरची या मालिकेतील पिंट्या या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला रोहन गुजर सध्या बन मस्का या मालिकेत काम करत आहे. यानंतर आता रोहन एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. रोहनने त्याच्या काही मित्रांच्या मदतीने एक प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे आणि या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनर अंतर्गत ते एका लघुपटाची निर्मिती करत आहे.धुम्रपान करणे हे आरोग्यास घातक आहे असे सांगूनही लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. धुम्रपान याच मुद्द्यावर आधारित अॅक्टिव्ह पॅसिव्ह अशी शॉर्टफिल्म रोहनच्या प्रोडक्शन हाऊसने बनवली असून यात तो स्वतः अभिनयदेखील करणार आहे. या शॉर्टफिल्ममध्ये आकांक्षा गाडेदेखील आहे. आकांक्षा सध्या अस्सं सासर सुरेख बाई या मालिकेत काम करत आहे. या लघुपटाविषयी रोहन सांगतो, "धुम्रपान करणे हे शरीरास घातक आहे हे माहीत असूनही लोक धुम्रपान करतात आणि त्यातही सिगारेटच्या धुराचा केवळ त्यांच्याच नव्हे तर त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. धुम्रपान या विषयावर पाच मिनिटांची अॅक्टिव्ह पॅसिव्ह हा लघुपट असून स्मोकिंग किल्स हा संदेश आम्ही यामार्फत देण्याचा प्रयत्न करणार आहोत. या लघुपटासाठी प्रमोशनल साँगदेखील आम्ही बनवले आहे. इंडियन आयडल फेम आदिती पॉलने हे गाणे गायले असून हे एक लव्ह साँग आहे. स्मोकिंगच्या संदर्भातील हे लव्ह साँग रसिकांना आवडेल अशी मला खात्री आहे. अॅक्टिव्ह पॅसिव्ह हा लघुपट आम्ही युट्युबला लाँच केला असून हे साँग आम्ही 14 फेब्रुवारीला व्हेलेंटाईन दिनाच्या निमित्ताने रिलिज करणार आहोत. एका सामाजिक प्रश्नासाठी आम्ही काम करत असल्याने या लघुपटाशी निगडित असलेल्या सगळ्यांनी या लघुपटासाठी खूपच कमी पैसे घेतले आहेत. आमच्या लघुपटामुळे काही लोक जरी धुम्रपानापासून दूर गेले तर ते आमचे यश असेल.