केदार शिंदे दिग्दर्शित 'बाईपण भारी देवा' सिनेमा बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घालतोय. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने, दीपा परब आणि सुचित्रा बांदेकर या अभिनेत्रींनी मिळून सिनेमात धमाल आणली आहे. हीच धमाल आता महाराष्ट्रातील सर्वच बायका थिएटरमध्ये अनुभवत आहेत. रोहिणी हट्टंगडी या दिग्गज अभिनेत्रीने सिनेमा जया ही मोठ्या बहिणीची भूमिका साकारली आहे. 'गांधी' सारखा सुपरहिट सिनेमा देणाऱ्या रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangady) यांनी नुकताच एक खुलासा केलाय. अभिनय क्षेत्रात यायची इच्छा नव्हती असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलंय.
रोहिणी हट्टंगडी गेल्या अनेक वर्षांपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. हिंदी मराठी चित्रपट, नाटक, मालिका अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांनी नाव कमावलं आहे. 'बाईपण भारी देवा' निमित्त सध्या संपूर्ण टीम वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती देत आहे. अशाच एका मुलाखतीत रोहिणी म्हणाल्या, 'मला डॉक्टर बनायचं होतं. पण हवं ते महाविद्यालय मिळू शकलं नाही. म्हणून तो विचार बाजूला ठेवत मी अभिनयाकडे वळले. माझे वडीलही याच क्षेत्रात होते त्यामुळे मी तो निर्णय घेतला. आईने मला कायम प्रोत्साहन दिलं. तेलुगू सिनेमातून मी बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली.'
रोहिणी हट्टंगडी यांची सर्वात जास्त गाजलेली मालिका म्हणजे 'चार दिवस सासूचे'. अनेक वर्ष चाललेल्या या मालिकेने मराठी प्रेक्षकांवर बराच काळ अधिराज्य गाजवलं होतं. त्यांच्या 'होणार सून मी या घरची' मालिकेने मोठं यश मिळवलं. आता त्यांचा 'बाईपण भारी देवा' सिनेमा तुफान कामगिरी करत आहे.