Join us

तीन वर्ष लिव्ह इनमध्ये राहिले रोहित अन् जुई, लग्नाआधीच एकत्र राहण्याचं सांगितलं महत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2024 12:45 PM

३ वर्ष लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतल्यावर आईवडिलांची अशी होती प्रतिक्रिया

रोहित राऊत (Rohit Raut) आणि जुईली जोगळेकर (Juilee Joglekar) ही सुरेल जोडी सर्वांचीच लाडकी आहे. सा रे ग म प लिटिल चॅम्प्सवेळी त्यांची ओळख झाली. लहानपणापासूनच ते एकमेकांना ओळखत होते. नंतर मैत्री आणि प्रेम या गोष्टी आल्या. तरी या जोडीने लग्नाआधी तीन वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. तसंच त्यांच्या पालकांनीही त्यांना ही परवानगी दिली. लिव्ह इन रिलेशनशिप  का महत्वाचं आहे हे दोघांनी एका मुलाखतीत समजावून सांगितलं.

'दिल के करीब' या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रोहित राऊत म्हणाला, "लॉकडाऊन लागल्यावर आम्ही जुईलीच्या आईवडिलांना फोन केला. मी तिच्या घरी शिफ्ट होतो असं सांगितलं. तिथे २४ तास जेव्हा एकमेकांबरोबर राहायची सवय लागली तेव्हा एकमेकांच्या सवयीबद्दल कळलं. सहा महिन्यात आम्ही रुळलो होतो. लिव्ह इन रिलेशनशिपमुळे आम्हाला खूप मदत झाली. उद्या जाऊन असं म्हणायला नको की तू असा असशील किंवा अशी असशील हे माहित नव्हतं."

तो पुढे म्हणाला, " आम्ही घरच्यांना विचारणार होतो की आम्ही लिव्ह इनमध्ये राहू का. तुमच्या तत्वांच्या बाहेर वाटत असेल तर आपण दुसरा पर्याय शोधू या. आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला तीन वर्ष लागणार आहेत. या तीन वर्षात आम्ही ठरवू की आम्हाला पुढे लग्न करायचंय की नाही. आईबाबांनाही कळलं की आम्ही खूप विचार करुन बोलत आहोत. त्यामुळे तेही तयार झाले. ब्रेकअप होणं वेगळं आणि घटस्फोट घेणं वेगळं. त्यामुळे आधी सहा महिने तरी एकत्र राहून बघा आणि ठरवा की खरंच तुम्हाला या व्यक्तीबरोबर आयुष्य घालवायचंय का."

रोहित राऊत आता प्रोफेशनल प्ले बॅक सिंगर आहे. मराठी, हिंदी सिनेमांसाठी तो गाणी गातो तसंच कंपोजही करतो. तर जुईलीही प्रसिद्ध गायिका आहे. दोघांची लाईव्ह कॉन्सर्ट्सही होतात. 2022 मध्ये हे क्युट कपल लग्नबंधनात अडकलं.

टॅग्स :रोहित राऊतसंगीतलग्नरिलेशनशिप