Join us

रोहित शेट्टीला आवडतो निळू फुलेंचा 'हा' चित्रपट, म्हणाला, 'लहानपणी दूरदर्शनवर...'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 3:24 PM

'स्कूल, कॉलेज आणि लाईफ' या सिनेमाच्या माध्यमातून रोहित शेट्टीने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.

हिंदीतील सुपरहिट दिग्दर्शक रोहित शेट्टीचा (Rohit Shetty) पहिलाच मराठी सिनेमा 'स्कुल , कॉलेज आणि लाईफ' लवकरच प्रदर्शित होणार आहे. रोहित शेट्टीने निर्मित केलेला हा मराठी भाषेतला पहिलाच सिनेमा त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता ताणली आहे. यामध्ये सर्वांची लाडकी तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash) आणि अभिनेता करण परब मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाच्या टीमने लोकमतच्या फिल्मी पंचायतमध्ये संवाद साधला. यावेळी रोहित शेट्टीने फिल्मविषयी आणि त्याच्या आवडत्या मराठी सिनेमांविषयी माहिती दिली.

'स्कूल, कॉलेज आणि लाईफ' या सिनेमाच्या माध्यमातून रोहित शेट्टीने मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. मराठीत पदार्पणासाठी हाच सिनेमा का निवडला याचं उत्तर देताना रोहित म्हणाला,'सिनेमाबाबत सगळ्यात महत्वाचं हे की  हा 'रोहित शेट्टी' चा सिनेमा नाही. तुम्ही पाहाल तर कळेल की खूप साधा असा हा विषय आहे. प्रत्येकाला त्याच्या शाळा, कॉलेजच्या आठवणींना जोडणारा आहे. कोणाला त्यांचं जुनं प्रेम आठवेल तर कोणाला प्रेमभंगाची आठवण होईल. त्यामुळे सिनेमात एखादा तरी असा सीन असेल की तुम्हाला वाटेल हे माझ्यासोबतही घडलं आहे. म्हणूनच याच सिनेमाची निर्मिती करायचं ठरवलं.'

रोहित शेट्टी सुरुवातीपासूनच मराठी सिनेमांचा चाहता आहे. त्याचं मराठीशी खास कनेक्शन आहे. कोणता मराठी चित्रपट आजही प्रेरित करतो यावर रोहित म्हणाला,'लहानपणी दूरदर्शनवर शनिवारी मराठी आणि रविवारी हिंदी चित्रपट लागायचे. तेव्हा अनेक मराठी सिनेमे बघितले. 'पिंजरा' हा माझा सर्वात आवडता सिनेमा. लहानपणी कुटुंबातील सर्वच एकत्र येऊन दूरदर्शनवर चित्रपट बघायचे. ती एक प्रथाच झाली होती. तर शनिवारच्या दिवशी लागणारे अनेक मराठी चित्रपट बघितले.

'स्कूल कॉलेज आणि लाइफ' या सिनेमाचं दिग्दर्शन विहान सूर्यवंशीने केलं आहे. हा सिनेमा 14 एप्रिल 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. 2020 मध्ये तेजस्वी रोहित शेट्टीचा 'खतरों के खिलाडी' हा शो करत होती त्यावेळी या सिनेमाची घोषणा झाली होती. पण काही कारणांमुळे रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. अखेर आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी येत आहे

टॅग्स :रोहित शेट्टीनिळू फुलेमराठी अभिनेतामराठी चित्रपटतेजस्वी प्रकाश