दर्जा : **1/5 ......................................................................
कलाकार : करण परब (Karan Parab ), कुणाल शुक्ल (Kunal Shukla), सना प्रभू, मुग्धा चाफेकर, आयुषी भावे, हेमल इंगळे, तन्विका परळीकर, ओंकार भोजने, सौरभ चौघुले, रजत कपूरदिग्दर्शक : विहान सूर्यवंशीनिर्माता : मनन शाहशैली : ड्रामाकालावधी : २ तास ५६ मिनिटे..........................
Roop Nagar Ke Cheetey Marathi Movie Review: दिग्दर्शकापासून कलाकारांपर्यंत संपूर्ण नवीन टिम जेव्हा एखादा सिनेमा बनवते, तेव्हा त्यांच्याकडून नावीन्यपूर्ण कथानकाची अपेक्षा असते. त्यानुसार ‘रुपनगर के चीते’ या शीर्षकावरून प्रथमदर्शनी हिंदी वाटणारा हा सिनेमाही काही वेगळे मुद्दे मांडणारा आहे. तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेला हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीला उदयोन्मुख कलाकार देणारा ठरणार आहे. रोहित शेट्टीसोबत काम केलेल्या दिग्दर्शक विहान सूर्यवंशीनं दोन मित्रांची गोष्ट सांगताना प्रेमाची किनारही जोडली आहे.
कथानक : अखिल आणि गिरीश (करण परब आणि कुणाल शुक्ल) या बालपणापासूनचे मित्र असणाऱ्या दोन तरुणांची कथा यात आहे. एका बिझनेस कॉन्फरन्सच्या निमित्तानं बऱ्याच वर्षांनी भेटलेले अखिल आणि गिरीश एकमेकांसमोर येतात आणि फ्लॅशबॅकमध्ये त्यांचं पूर्वश्रमीचं जीवन उलगडत जातं. गणेशोत्सवातील मिरवणूकीत स्वीकारलेल्या चॅलेंजसाठी दोघेही ठरवून माया आणि देविका (आयुषी भावे, हेमल इंगळे) या दोन तरुणींसोबत प्रेमाचं नाटक करू लागतात. एका क्षणी दोघेही त्यांच्या प्रेमात पडतात की काय ते नेमकं समजत नाही, पण त्यानंतर घडलेल्या काही घटना दोघांमध्ये वितुष्ट आणतात. बालपणापासूनची मैत्री तुटते आणि दोघेही आपापला मार्ग निवडतात. मध्यंतरीच्या काळात त्यांच्या जीवनात बरेच उतार-चढाव येतात. त्यातून सावरत अखेरीस मैत्रीचा विजय होतो का त्याचं उत्तर या चित्रपटात आहे.
लेखन-दिग्दर्शन : एकाच चित्रपटात बरेच विषय आणि पैलू सामावून घेण्याच्या नादात पटकथेची लांबी वाढली आहे. दिग्दर्शकाच्या रूपात विहाननं चांगलं काम केलं असलं तरी गती आणि लांबीवर नियंत्रण ठेवणं गरजेचं होतं.
आजवर मैत्रीवर बरेच चित्रपट आले असले तरी यात काही वेगळे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटाचं टायटल दुसरं कोणतंही असतं तरी चाललं असतं. कारण स्वत:ला चीते म्हणवणारे दोन्ही नायक चीत्याप्रमाणे विरोधकांवर हल्ला करण्याऐवजी त्यांच्याकडूनच पोटभर मार खातात. तरुणाईला भावणारं वातावरण, भाषाशैली, दोन गटांमधलं वैर, हाणामारी, गंमती जंमती, प्रेम प्रकरणं, चॅलेंजेस, चिटींग, मौज-मस्ती सारं काही यात आहे. प्रेम ही भावना समजून घेताना दोन मित्रांमध्ये निर्माण झालेलं वैर आणि त्यानंतर आलेला दुरावा दूर करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणं गरजेचं असतं हा विचारही यात आहे. केवळ साथ देणं म्हणजे मैत्री नव्हे, तर मैत्रीत माफ करणंही आलं. हे सर्व असूनही सुरुवातीपासून अखेरपर्यंत असलेली मंद गती चित्रपटाला मारक ठरली आहे. जेमतेम दोन-सव्वा दोन तासांत आटोपता येण्याजोगं कथानक जवळपास तीन तासांपर्यंत खेचल्यानं उत्सुकता रहात नाही. कॉस्च्युमपासून गेअअपपर्यंत सर्वच बाबतीत हा चित्रपट तरुणाईच्या रंगात रंगलेला दिसतो. गाणी तितकीशी प्रभावी नसली, तरी गाणी आणि काही दृश्यांमधील लोकेशन्स अफलातून आहेत. डिओपी संतोष रेड्डी यांनी सुरेख सिनेमॅटोग्राफी केली आहे. तांत्रिकदृष्ट्या चित्रपट सक्षम आहे.
अभिनय : मुख्य भूमिकेतील सर्वच कलाकारांनी सहजसुंदर अभिनयाचं दर्शन घडवलं आहे. करण परब आणि कुणाल शुक्ल या दोघांनीही आपापल्या व्यक्तिरेखा अत्यंत मेहनतीनं साकारल्या आहेत. कुठेही ओव्हरअॅक्टींग न करता आपापल्या व्यक्तिरेखांचा मूड जपत दोघांनीही आपलं काम केलं आहे. पूर्वार्धात आयुषी भावेच्या जोडीला हेमल इंगळे या दोन अभिनेत्रींनी छान काम केलं आहे, तर उत्तरार्धात सना प्रभू आणि मुग्धा चाफेकर या दोघींनी त्यांची उणीव भरून काढली आहे. तन्विका परळीकरनं नायकाच्या बहिणीची छोटीशी पण महत्त्वपूर्ण भूमिका सहज साकारली आहे. ओंकार भोजनेनंही चांगला प्रयत्न केला आहे. रजत कपूर यांनी वरवर खडूस वाटणारा, पण आतून प्रेमळ असलेल्या बॉसची भूमिका सुरेखरित्या साकारली आहे.
सकारात्मक बाजू : कलाकारांचा अभिनय, नेत्रसुखद लोकेशन्स, कॅमेरावर्क, कलाकारांचे लुक आणि सादरीकरणनकारात्मक बाजू : चित्रपटाची लांबी, संथ गती, गाणी, संकलन आणि काही कंटाळवाणी दृश्ये
थोडक्यात : तरुणाईच्या जीवनशैलीचं दर्शन घडवणाऱ्या या चित्रपटाचा लांबीने घात केला असला तरी नवोदित कलाकार-दिग्दर्शकाच्या टिमनं केलेला हा प्रयत्न एकदा पहायला हरकत नाही.