Join us  

मैत्रीचं नातं सांगणारा ‘रूप नगर के चीते’ उद्या येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2022 2:40 PM

हा चित्रपट प्रत्येकाला महाविद्यालयीन दिवसांची नक्कीच आठवण करून देईल असा विश्वास चित्रपटाच्या कलाकारांनी व्यक्त केला.

प्रत्येक नात्याचा एक राखीव कोपरा असतो. यात एक खास कोपरा मैत्रीचाही असतो. आपल्या सुख दु:खात सदैव आपल्या सोबत असणारी व्यक्ती म्हणजे मित्र... आयुष्याच्या चढउतारात मन हलकं करायला मैत्रीचं नातं हवं असतं. म्हणून आपल्याभोवती मैत्रीचा दरवळ असेपर्यंतच,  आपल्या मनातल्या मैत्रीच्या या कोपऱ्याचं स्थान किती महत्त्वाचं आहे हे त्यांना व्यक्त करून सांगणं गरजेचं असतं. हाच आशय 'रूप नगर के चीते' या आगामी मराठी चित्रपटातून अधोरेखित करण्यात आला आहे.  'रूप नगर के चीते' उद्या( १६ सप्टेंबरला) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

हा चित्रपट प्रत्येकाला महाविद्यालयीन दिवसांची नक्कीच आठवण करून देईल असा विश्वास चित्रपटाच्या कलाकारांनी व्यक्त केला. मैत्रीच्या नात्यातली आपली भावनिक गुंतवणूक सच्ची असते ती जपणे महत्त्वाचे असल्याचे सांगत हा चित्रपट प्रत्येकाला निखळ आनंद देईल असं दिग्दर्शक विहान सूर्यवंशी यांनी याप्रसंगी सांगितलं. या चित्रपटातून प्रेक्षकांना बॉलीवूड सारखी भव्यता अनुभवायला मिळेल असं निर्माते मनन शाह यांनी सांगितलं.

करण परब आणि कुणाल शुक्ल हे दोन युवा कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांसोबत हेमल इंगळे, आयुषी भावे, सना प्रभु, मुग्धा चाफेकर, तन्विका परळीकर, ओंकार भोजने, सौरभ चौघुले, रजत कपूर हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत.

'रूप नगर के चीते' या चित्रपटाचे लेखन विहान सूर्यवंशी, कार्तिक कृष्णन यांनी केले असून छायांकन संतोष रेड्डी तर संकलन गोरक्षनाथ खांडे यांचे आहे.

टॅग्स :सेलिब्रिटी