अश्विनी भावे यांनी फिल्म इंडस्ट्रीतील मैत्रिणींना दिले रोपटे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2018 7:16 AM
अश्विनी भावे हे सिनेसृष्टीतील एक नावाजलेलं नाव आहे. त्यांनी साकारलेल्या सर्वच भूमिका या रसिक प्रेक्षकांच्या मनात अजूनही जिवंत आहेत. ...
अश्विनी भावे हे सिनेसृष्टीतील एक नावाजलेलं नाव आहे. त्यांनी साकारलेल्या सर्वच भूमिका या रसिक प्रेक्षकांच्या मनात अजूनही जिवंत आहेत. फक्त मराठीतच नाही तर त्यांनी त्यांच्या कलाकृतीने बॉलिवूड मध्ये वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे. बॉलिवूडच्या बड्या बड्या स्टार्स सोबत त्यांनी काम केले आहे. फक्त त्यांचे फॅन्सच नाही तर चित्रपट समीक्षकांनीही त्यांच्या कामाची नेहमीच तारीफ केली आहे. लग्नानंतर त्या अमेरिकेत जाऊन स्थायिक झाल्या. जागतिक महिला दिनानिमित्त मराठी चित्रपटसृष्टीतील प्रतिभावान अभिनेत्री अश्विनी भावे यांनी अशी एक गोष्ट केली आहे, ज्यामुळे आपल्याला त्यांचे निश्चितच कौतुक वाटेल. अश्विनी भावे या निसर्ग प्रेमी आहेत. त्यांना विविध प्रकारची रोपं लावण्याची आवड आहे. याविषयी त्या सांगतात, "मनापासून घेतलेल्या कष्टाचे चीज झाले की आपल्याला खरा आनंद होतो आणि समाधान मिळते. भाजीपाला लावून, त्याची लहान बाळाप्रमाणे निगा राखून जेव्हा ती बहरतात ते बघण्यात काही औरच मजा असते. त्यामुळे मी विविध भाज्यांची झाडं माझ्या घराच्या अंगणात लावली आहेत. ”अश्विनी भावे यांनी अलीकडेच द ग्रीन डोर असे कॅम्पेन सोशल मीडियावर सुरू केले आहे, ज्यात त्या वेळोवेळी किचन गार्डेनिंगवर आधारित व्हिडिओ ब्लॉग्स पोस्ट करतात. द ग्रीन डोर या हॅशटॅगला आणि त्यांच्या व्हिडिओ ब्लॉग्सना सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यांची गार्डनिंगची आवड आणि इतर महिला कलाकारांबद्दल त्यांना वाटणारी आपुलकी यांची सुंदर सांगड त्यांनी महिला दिनाच्या निमित्ताने घातली आहे.अश्विनी यांनी काही मराठी महिला कलाकारांना 'व्हाईट पीस लिली' आणि 'पुदिन्याची' रोपं भेट म्हणून देखील दिली आहेत. सोबत एक सुंदर हस्तलिखित पत्र देखील दिले आहे. ज्यात त्यांनी लिहिलं आहे की, त्यांनी दिलेल्या दोन रोपट्यांपैकी एक रोपटे ती व्यक्ती ज्या स्त्रीला आदर्श मानते त्या स्त्रीला भेट म्हणून द्यावे अशी गोड विनंतीही केली. ही खरोखरच एक उल्लेखनीय बाब आहे. याविषयी अश्विनी सांगतात, "कोणाला भेट म्हणून मला कोणत्याही प्रकाराचे रोपटं देणे कधीही जास्त आवडतं. ज्याप्रमाणे कोणतंही रोपटं वाढवण्यासाठी त्याला योग्य ती काळजी आणि पोषण द्यावं लागतं त्याच प्रमाणे एखाद्या स्त्रीला सक्षम, निर्भय आणि स्वावलंबी बनवण्यासाठी योग्य तेवढं प्रेम आणि घरच्यांचे प्रोत्साहन मिळावे लागते. सर्व कष्टकरू स्त्रियांना माझा सलाम."Also Read : तर असे अश्विनी भावे आणि तिच्या चाहत्यांमधील अंतर होणार कमी!