बडीशेप विक्रेता झाला चित्रपट निर्माता- रोशन भांबारे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 6:02 AM
स्वप्न फक्त बघायची नसतात तर त्यांचा पाठलाग करायचा असतो.अगदी सहज असं बोलून जातो पण ते जेव्हा सत्यात परिवर्तित होतं ...
स्वप्न फक्त बघायची नसतात तर त्यांचा पाठलाग करायचा असतो.अगदी सहज असं बोलून जातो पण ते जेव्हा सत्यात परिवर्तित होतं त्यावेळी जगात त्याहून आत्मिक समाधान दुसरे कोणतेही नसते. स्वप्न सगळेच बघतात पण त्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले तर ते पूर्ण होते हे घडलंय शिर्डीच्या रोशन भांबारे यांच्या बाबतीत.त्यांच्या बद्दलची ही गोष्ट आज अनेकांना प्रेरणादायी ठरते आहे.कारण त्यांनी त्यांना अशक्य अशी गोष्ट करून दाखवली आहे,ती म्हणजे त्यांनी शिवभक्त या मराठी सिनेमाची निर्मिती केली आहे.शिर्डीपासून जवळच एका खेड्या गावात जन्मलेले रोशन भांबारे आपल्या उपजीविकेसाठी २०१० साली पुण्यात आले.सुरुवातीला पुण्याच्या एका मोठ्या मॉलमध्ये कामाला लागले.तिथे काम करत असताना एका भल्या गृहस्थाशी त्यांची ओळख झाली आणि त्यांनी रोशनजींना मॉलमध्ये बडीशेप विकण्याचा सल्ला दिला.लहानपणापासून छत्रपती शिवाजी महाराजांवर श्रद्धा असलेल्या रोशन भांबारे यांनी बडीशेप विकण्याचे काम करत असतांना मोठा जनसंपर्क करून ठेवला.याच दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर मराठी सिनेमा करण्याचे त्यांचे स्वप्न ते पूर्ण करण्याचाप्रयत्न करत होते.सुट्टीची दिवशी त्यांच्या कथेवर पटकथा आणि सवांद लिहून ते शिर्डी येथील एका शाळेचे शिक्षक सागर शेट्ये यांचेकडून त्यावर मार्गदर्शन घेत.कथा, पटकथा, सवांद लिहून झाल्यावर मोठे कलाकार घेण्यासाठी पैसे नसल्याने पुण्याच्या सानिया चौधरी, नाशिकच्या अक्षय गमे आणि मुंबईच्या विशाल सावंत या नवोदित कलाकारांची प्रमुख भूमिकेसाठी निवड करण्यात आली.सिनेमाला चंद्र मोहन यांचे संगीत लाभले असून सिनेमात जावेद अली, साधना सरगम, प्रभाकर देवकर,कार्तिकी गायकवाड आणि नंदेश उमप यांनी गाणी गायली आहे.सिनेमाबद्दल रोशन भांबारे सांगतात की,ज्याप्रकारे शिवरायांनी स्वराज्यासाठी मावळे जमवून स्वराज्याची स्थापना केली त्याचप्रकारे मी सर्व नवोदित कलाकार घेऊन शिवभक्त सिनेमाची निर्मिती केली.सर्वांच्या मदतीने आज मी हा सिनेमा करू शकलो आहे. शिवरायांच्या विचारावर चालणाऱ्या एका तरुणाची संघर्ष गाथा या सिनेमात आहे.मला खात्री आहे की सर्व शिवभक्त माझा हा शिवभक्त सिनेमा नक्कीच पाहतील.