Join us

सलील कुलकर्णीच्या वेडिंग शिनेमामध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 5:05 PM

‘पक्या’ आहे ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटातील हिरो. त्याच्या या प्रेमकबुलीची तयारी त्याचा मित्रपरीवार कशी करतो आहे, हे लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

ठळक मुद्देशिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे १२ एप्रिल २०१९ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे

व्हॅलेंटाईन दिन जवळ येत असताना आणि सर्व युवक त्यात डुंबून जायला सज्ज झाले असताना आमचा हिरो पक्याही त्याच्या प्रेयसीला प्रपोज करण्याची तयारी करतोय. त्याचे मित्र आणि सुहृद त्याला त्याच्या या प्रयत्नात मदत करण्यासाठी सरसावले आहेत. अशावेळी आपला पक्या हे पाऊल उचलण्याचे धाडस करेल?

हा ‘पक्या’ आहे ‘वेडिंगचा शिनेमा’ या चित्रपटातील हिरो. त्याच्या या प्रेमकबुलीची तयारी त्याचा मित्रपरीवार कशी करतो आहे, हे लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. चित्रपटातील त्याच्या या स्थितीचे यथायोग्य दर्शन घडविणारे गाणे प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटाच्या माध्यमातून शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही जोडी प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे.

“बोल बोल पक्या, काहीतरी बोल पक्या...अरे भीड ना, अरे नड कि, काहीतरी बोल पक्या...” अशा आशयाचे हे ‘वेडिंगचा शिनेमा’मधील गाणे खूपच धमाल आहे. या गाण्यात त्याच्या आजूबाजूचे सर्वच त्याला त्याच्या प्रेयसीला प्रपोज करण्याची गळ घालत आहेत. पक्याला मात्र परीला ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे,’ हे सांगण्याची हिंमत होत नाही. पक्याची नेमकी स्थिती आणि द्विधा मनस्थिती या गाण्यातून नेमकी उधृत झाली आहे. हे गाणे शिवराज वायचळ, ऋचा इनामदार आणि प्रवीण तराडे यांच्यावर चित्रित झाले असून हे गाणे अवधूत गुप्ते यांनी गायले आहे.

या गाण्याच्या प्रदर्शानाआधी एक अत्यंत प्रभावी अशी सोशल मिडिया प्रसार मोहीम निर्मात्यांद्वारे चालविली गेली. त्यामुळे या चित्रपटाचा बोलबाला प्रेक्षकांमध्ये आधीच झाला आहे. पक्याला त्याच्या प्रपोज करण्याच्या कामगिरीवर धीर मिळावा म्हणून त्याला अगदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षापासून, रणबीर सिंग ते अगदी आपल्या आसपासच्या सर्वसामन्यांचाही समावेश होता. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाल्यावर आता पक्याच्या प्रपोज करण्यावर बेतलेले संपूर्ण गाणेच प्रेक्षकांसमोर येत असून ते घराघरात आणि त्यातही युवकांमध्ये लोकप्रिय होईल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

प्रख्यात संगीत दिग्दर्शक डॉ सलील कुलकर्णीचा दिग्दर्शक म्हणून हा पहिला चित्रपट असून त्याच्या या नव्या पर्वाची मराठी चित्रपटसृष्टीत सर्वांनाच उत्सुकता आहे. १२ एप्रिल २०१९ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची कथाही त्यांनीच लिहिली आहे. एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटच्या संजय छाब्रिया यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे तर नितीन वैद्य हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

शिवराज वायचळ, ऋचा इनामदार या नव्या जोडीचे चंदेरी पडद्यावरील पदार्पण या चित्रपटातून होत आहे. त्यांच्याशिवाय चित्रपटात मुक्ता बर्वे, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तराडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे आदींच्या भूमिका आहेत.

एव्हरेस्ट एंटरटेन्मेंटकडे अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांच्या निर्मितीचे श्रेय जाते. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, मुंबई पुणे मुंबई -२, मुंबई पुणे मुंबई - ३, बॉइज २, बापजन्म, आम्ही दोघी, हॅप्पी जर्नी, कॉफी आणि बरेच काही आणि टाइम प्लीज हे त्यांनी निर्मिती किंवा प्रस्तुती केलेले काही चित्रपट आहेत.

टॅग्स :सलील कुलकर्णीभाऊ कदममुक्ता बर्वे