Rukh trailer: मनोज वाजपेयीसह या हिंदी सिनेमात झळकणार मराठमोळी स्मिता तांबे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 6:30 AM
'रुख' या सिनेमातून स्मिता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. स्मितासह या सिनेमात हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता मनोज वाजपेयी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या सिनेमात स्मिता मनोज वाजपेयी यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमाची एका कुटुंबाभोवती फिरत असल्याचे या अडीच मिनिटांच्या ट्रेलरवरुन पाहायला मिळत आहे.
मराठीतील अनेक अभिनेत्रींनी मराठी सिनेमासह हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यापासून ते आजच्या सई ताम्हणकरपर्यंत विविध अभिनेत्रींनी हिंदी सिनेमात काम केलं आहे. याच अभिनेत्रींमध्ये आता आणखी एक मराठमोळं नाव स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे स्मिता तांबे. मोठ्या ब्रेतनंतर स्मिता रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. मात्र स्मिता मराठी नाही तर हिंदी सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. 'रुख' या सिनेमातून स्मिता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. स्मितासह या सिनेमात हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता मनोज वाजपेयी प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या सिनेमात स्मिता मनोज वाजपेयी यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमाची एका कुटुंबाभोवती फिरत असल्याचे या अडीच मिनिटांच्या ट्रेलरवरुन पाहायला मिळत आहे. वडिलांचा होणारा मृत्यू आणि त्यांच्या मृत्यूची कारणे शोधत असताना मुलाचा संघर्ष या सिनेमात पाहायला मिळणार आहे. आदर्श गौरव साकारत असलेला ध्रुव हा बोर्डिंगमध्ये राहत असतो. घरापासून दूर असल्यामुळे घरात घडणा-या घटनांबद्दल ध्रुवला काहीच कल्पना नसते. त्याचवेळी ध्रुवला आपल्या वडिलांचा (मनोज वाजपेयी) कार अपघातात मृत्यू झाल्याचं कळतं. वडिलांच्या मृत्युमुळे ध्रुवचं जणू काही आयुष्यच पालटतं. आपल्या वडिलांचा मृत्यू हा अपघाती नसून त्यात घातपात झाल्याचा संशय त्याला असतो. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूची कारणं शोधण्यासाठी संघर्ष करु लागतो. त्याचा हा संघर्ष रुख सिनेमातून पाहायला मिळणार आहे. यांत स्मिता तांबे ध्रुवच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे. बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणच्या 'सिंघम रिटर्न्स' या सिनेमात स्मिता तांबे झळकली होती.याशिवाय गणवेश, लाठी, परतु, बायोस्कोप, कँडल मार्च, 72 मैल, तुकाराम, देऊळ, जोगवा, तुकाराम, नातीगोती या मराठी सिनेमातूनही स्मिताने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यामुळे आता रुख या सिनेमातून स्मिता हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण करणार का याकडे आता नजरा लागल्या आहेत. 27 ऑक्टोबरला हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.