Join us

'इथे असाल तर ऐतिहासिक सिनेमा करायचा, आणि..'; मराठीतल्या ट्रेंडवर सचिन खेडेकरांची थेट प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 9:45 AM

Sachin khedekar: सचिन खेडेकर कलाविश्वात घडणाऱ्या अनेक गोष्टींवर स्पष्टपणे त्यांचं मत व्यक्त करत असतात. यावेळी त्यांनी इंडस्ट्रीमध्ये रूजत चाललेल्या ट्रेंडवर भाष्य केलं आहे.

मराठी कलाविश्वातील अभ्यासू आणि गुणी कलाकार म्हणजे सचिन खेडेकर (sachin khedekar). नाटक, चित्रपट, रिअॅलिटी शो अशा विविध माध्यमातून सचिन खेडेकर यांनी कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूड, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि गुजराती या भाषांमध्येही त्यांनी काम केल्याचं सांगण्यात येतं. सचिन खेडेकर कलाविश्वात घडणाऱ्या अनेक गोष्टींवर स्पष्टपणे त्यांचं मत व्यक्त करत असतात. यावेळी त्यांनी मराठी सिनेमांचं विदेशात होणाऱ्या चित्रीकरणावर भाष्य केलं आहे.

कोव्हिड काळात लागलेल्या लॉकडाऊननंतर अनेक मराठी सिनेमांचं लंडनमध्ये शुटिंग करण्यात आलं. 'दे धक्का २', 'व्हिक्टोरिया' यांसारख्या सिनेमांचं लंडनमध्ये चित्रीकरण झालं. त्यानंतर आता मराठी कलाविश्वात हा जणू नवा ट्रेंडच सुरु झाला आहे. अनेक सिनेमांचं विदेशात शुटिंग होताना दिसत आहे. त्यामुळेच सिनेसृष्टीत आलेल्या या नव्या ट्रेंडवर सचिन खेडेकर यांनी भाष्य केलं आहे.

'म्हणूनच मी आजकालच्या मालिकांमध्ये काम करत नाही'; सचिन खेडेकरांनी मांडलं परखड मत

गेल्या काही काळापासून सचिन खेडेकर मराठी सिनेमांमध्ये फारसे दिसले नाहीत. याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिलं.  "मराठी सिनेमांसाठी विचारणा होत असते. पण, सध्या मराठीमध्ये दोन प्रकारचे सिनेमा येत आहेत. एक तर ऐतिहासिक नाही तर इंग्लंडला जाऊन केलेले सिनेमा. इथे असाल तर ऐतिहासिक सिनेमा करायचा. आणि,  इंग्लंडमध्ये जाऊन मुंबई-पुण्यातल्या गोष्टी सांगायच्या. मला हे करता आलेलं नाही", असं सचिन खेडेकर म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "अर्थात याला काही अपवाद आहेत. वाळवी, महाराष्ट्र शाहीर हे काही सिनेमे उत्तम होते. या मधल्या प्रवाहातला सिनेमा पुन्हा यावा याची मी वाट पाहतोय."

दरम्यान, सचिन खेडेकर यांनी कोकणस्थ, काकस्पर्श, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आईचा घो यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसंच इम्तिहान, सैलाब, थोडा हे थोडे कि जरूरत हे, टिचर, चाळ नावाची वाचाळ वस्ती या मालिकांमध्ये काम केलं आहे.

टॅग्स :सचिन खेडेकरसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन