Join us  

'जया अमिताभ बच्चन' यावरुन झालेल्या संसदेतील वादावर सचिन-सुप्रिया म्हणाले, "त्यांची संस्कृती..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2024 5:58 PM

सचिन-सुप्रिया यांच्या प्रतिक्रेयेनंतर होतंय कौतुक

सध्या सोशल मीडियावर एक मुद्दा जोरात गाजतोय. संसदेत अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी गदारोळ घातला. सभापतींनी 'जया अमिताभ बच्चन' (Jaya Amitabh Bachchan) असं नाव घेतल्याने त्यांना राग आला. आपली वेगळी ओळख आहे नवऱ्याचं नाव घ्यायची गरज काय असा जया बच्चन यांचं म्हणणं होतं. विशेष म्हणजे या मुद्द्यावरुन पुढच्या दिवशी परत तेच झालं. यानंतर जया बच्चन ट्रोलही झाल्या तर काही जणांनी त्यांची बाजू घेतली. यावर मराठमोळी जोडी सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) आणि सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar) यांनी त्यांचं मत व्यक्त केलं. 

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत दोघांना विचारण्यात आलं की सुप्रिया यांना नेहमी सुप्रिया सचिन पिळगांवकर याच नावाने ओळखलं जातं.  त्यामुळे सध्या सुरु असलेल्या जया बच्चन यांच्या वादावर दोघांनी उत्तर दिलं. सचिन पिळगांवकर म्हणाले, "ती आपली संस्कृती आहे. आपल्या मराठी संस्कृतीत तसं नाव घेतलं जातं जे दुसऱ्या कोणत्याही संस्कृतीत घेतलं जात नाही. त्यामुळे त्यांना कोणाला आवडणं न आवडण्यापेक्षा त्यांच्या संस्कारात ही गोष्ट आहे का हे पाहणं गरजेचं आहे."

नंतर सुप्रिया पिळगांवकर म्हणाल्या, "तुम्हाला विश्वास बसणार नाही पण एक सांगते  की मला असं कधी ऐकूच आलेलं नाही की ही बघ सुप्रिया, ही बघ सुप्रिया चाललीये. कधीच नाही. नेहमी सचिनची बायको हेच ऐकू आलंय. यात मला अभिमानच वाटतो आणि मला कौतुकच आहे याचं. माझी वेगळी ओळख नाहीए का असं मी म्हणायला पाहिजे पण असं काही नाही. मला मात्र ते सचिनची बायको म्हणूनच ओळखतात आणि त्यात माझी काहीही तक्रार नाही."

यावर सचिन पिळगांवकर पुढे म्हणाले, "मला सुद्धा अनेकदा सुप्रियाचा नवराच म्हणतात. आणि जेव्हा मला कुठे बोलवलं जातं तेव्हा म्हणतात की अरे सुप्रिया नाही आली? मला असं वाटतं की अरे एकावर एक फ्री आहे का तिला बोलवायला पाहिजे ना तुम्ही. ती सुद्धा वेगळी व्यक्ती आहे."

टॅग्स :सचिन पिळगांवकरसुप्रिया पिळगांवकरमराठी अभिनेताजया बच्चन